कोळसा खाणीत टीम शक्तीची महत्त्वाची भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:09 AM2021-03-08T04:09:47+5:302021-03-08T04:09:47+5:30
नागपूर : कोळशाला भूगर्भातून काढणे आणि त्याला विजेच्या यंत्रापर्यंत आणि इतर ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यात वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या महिला कर्मचारी महत्त्वाची ...
नागपूर : कोळशाला भूगर्भातून काढणे आणि त्याला विजेच्या यंत्रापर्यंत आणि इतर ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यात वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या महिला कर्मचारी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यांना टीम शक्तीच्या नावानेही ओळखण्यात येते. या प्रशिक्षित महिला कर्मचारी कोळसा खाणीत वर्कशॉप ऑपरेटर, इलेक्ट्रिशियन, आर्मेचर वाईंडर, वेल्डर, मोल्डर, पंप ऑपरेटर, फिटर आदींची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडत आहेत. काही महिला कर्मचारी क्लार्क, डाटा एन्ट्री ऑपरेटर, अकाउंटंट, केमिस्ट, तर काही स्टाफ नर्स, पॅरामेडिकल आणि सुरक्षा कर्मचाऱ्याच्या रूपाने कार्यरत आहेत. त्यांना अनेकदा वेलोचीच्या ‘रिअल हिरो’म्हणून सन्मानित करण्यात आले आहे.
रितू विश्वकर्मा ()
वेकोलीच्या पेंच क्षेत्रात कार्यरत रितू विश्वकर्मा मशिनिष्टचे काम जबाबदारीने करतात. त्यांनी मशीनमध्ये रॉडची थ्रेड बनविण्याचे काम केले आहे. त्यांचे मुख्य काम बेरिंग प्लेटची कटिंग करणे आणि डब्ल्यू स्ट्रेप बनविण्याचे आहे. मुख्य म्हणजे हे काम पुरुष करीत असतात.
मूनाक्षी कपूर ()
वेकोलीच्या वणी क्षेत्रातील निलजई खुल्या खदानीत मीनाक्षी प्रदीप कपूर हेवी अर्थ मुव्हिंग मशीनरी हायड्रोलिक शॉवेल चालवितात. देशात कोळशाची टंचाई होऊ नये म्हणून वीज उत्पादनासाठी कोळसा काढण्यासाठी खुल्या मैदानात त्या ओव्हरबर्डन हटविण्याचे महत्त्वाचे काम करतात.
सविता मन्ने ()
सविता मन्ने कोल हँडलिंग प्लान्टमध्ये क्रशर ऑपरेटरची जबाबदारी पार पाडतात. आपल्यामुळे कंपनीच्या कामात अडथळा येऊ नये याकडे त्यांचे लक्ष राहते. त्या मेहनत आणि जिद्दीने आपले काम पूर्ण करतात.
उर्मिला दुबे ()
कॅटेगिरी १ कर्मचारी उर्मिला दुबे कुशलतेने बेल्ट आणि क्रशर ऑपरेटरच्या पदावर जबाबदारीने काम करीत आहेत. आपल्या कामासोबत त्या आपल्या सहकाऱ्यांनाही चांगले काम करण्यासाठी प्रेरणा देतात.
सुनीता बागडे ()
मुख्यालयात वरिष्ठ सुरक्षा कर्मचारी या पदावर कार्यरत सुनीता बागडे यांनी आपली कौटुंबिक जबाबदारी सांभाळून आपल्या कामात योगदान दिले आहे. त्यांच्या जीवनातील संघर्षाची कथा सर्व महिलांसाठी प्रेरणादायी आहे. कमी वयात आई-वडील गमावल्यानंतर त्यांनी जीवनात कधी पराभव पत्करला नाही.
............