चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पत्नीसोबत संसार अशक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:09 AM2021-03-08T04:09:25+5:302021-03-08T04:09:25+5:30
राकेश घानोडे नागपूर : पतीच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या व त्यावरून पतीला वारंवार अपमानित करणाऱ्या पत्नीसोबत संसार करणे अशक्य आहे, ...
राकेश घानोडे
नागपूर : पतीच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या व त्यावरून पतीला वारंवार अपमानित करणाऱ्या पत्नीसोबत संसार करणे अशक्य आहे, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व पुष्पा गणेडीवाला यांनी दिला आहे.
प्रकरणातील पत्नीला तिच्या पतीचे कार्यालयातील एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. त्यामुळे ती पतीच्या कार्यालयात जाऊन गाेंधळ घालत होती. पतीला चारित्र्यावरून शिवीगाळ करीत होती. तसेच, त्याला मुलांपुढेही अपमानित करीत होती. पत्नीची ही कृती पतीकरिता मानसिक छळ आहे. परिणामी, त्याला पत्नीसोबत संसार करण्यास बाध्य केले जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने हा निर्णय देताना नमूद केले.
पत्नीचे बेजबाबदार वागणे असह्य झाल्यानंतर पतीने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून पत्नीचे समुपदेशन करण्याची मागणी केली होती. न्यायालयाने ही बाब लक्षात घेता सामान्य स्वरूपाच्या परिस्थितीत कोणताही पती पोलीस ठाण्यात जात नाही असे मत व्यक्त करून पत्नीच्या क्रूरतापूर्ण वागणुकीवर शिक्कामोर्तब केले. सदर पतीला पत्नीविरुद्ध गुन्हा नोंदवायचा नव्हता. पोलिसांनी पत्नीचे समुपदेशन करावे एवढाच त्याचा उद्देश होता. त्यानुसार महिला कक्षात पत्नीचे समुपदेशनही करण्यात आले, पण तिने स्वत:च्या स्वभावात बदल केला नाही. एवढेच नाही तर, घटस्फोट याचिका प्रलंबित असताना पती दोन वर्षे पत्नीसोबत राहिला. शेवटी पत्नीच्या वाईट वागणुकीला कंटाळून त्याने स्वत:चे घर सोडले व तो भाड्याच्या घरात रहायला गेला. पतीने स्वत:चे घर पत्नीच्या नावावर केले असून त्याच्या कर्जाची तो स्वत: परतफेड करीत आहे. त्यावरून पती स्वत: वाईट नसल्याचे व पत्नी त्याचा छळ करीत असल्याचे सिद्ध होते, असेदेखील न्यायालयाने स्पष्ट केले.
-----------------
घटस्फोटाचा आदेश कायम ठेवला
प्रकरणातील दाम्पत्य नागपूर येथील रहिवासी आहे. कुटुंब न्यायालयाने पतीला घटस्फोट मंजूर केल्यामुळे पत्नीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने सदर निर्णय देऊन पत्नीचे अपील खारीज केले व पतीला मिळालेला घटस्फोट कायम ठेवला.