मुंबईच्या पथकाचे सुपारी गोदामांवर छापे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 01:03 AM2017-09-15T01:03:57+5:302017-09-15T01:04:18+5:30
सडक्या सुपारीवर रासायनिक प्रक्रिया करून ती नागरिकांना खाऊ घालणाºया आणि त्या माध्यमातून देशातील लाखो नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाºयांची ....
नरेश डोंगरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सडक्या सुपारीवर रासायनिक प्रक्रिया करून ती नागरिकांना खाऊ घालणाºया आणि त्या माध्यमातून देशातील लाखो नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाºयांची डावबाजी सरकारच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी नागपूरच्या सुपारीबाजांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. या पार्श्वभूमीवर, कळमना आणि मौद्याच्या जवळ असलेल्या गोदामावर मुंबईहून आलेल्या विशेष पथकांनी गुरुवारी सायंकाळी छापामार कारवाई केल्याची खास सूत्रांची माहिती आहे.
विशेष म्हणजे, नेहमीप्रमाणे आजचीही कारवाई दडपण्यासाठी संबंधित दलालांनी रात्रीपर्यंत धावपळ चालवली होती. दुसरीकडे अशी कारवाईची चर्चा ऐकत असलो तरी कारवाई करणारी चमू कुठली आहे, त्याची आपल्याला माहिती नाही, असे एफडीएचे वरिष्ठ सांगत होते.
ााणीत फेकलेली निकृष्ट सुपारी इंडोनेशियाहून कंटेनरने नागपुरात आणायची. तिच्यावर रासायनिक प्रक्रिया करायची आणि आरोग्यास घातक असलेली ही सुपारी खर्रा, सुगंधित पानमसाला, गुटखा आदीच्या माध्यमातून विकण्याचा गोरखधंदा अनेक वर्षांपासून सुरू आहे. नागपुरात अशाप्रकारे रासायनिक प्रक्रिया केलेले घातक सुपारीचे अनेक ट्रक महाराष्ट्रातील विविध शहरांसह विविध राज्यात पाठविले जातात. अन्न व औषध विभागाच्या अधिकाºयांनी या गोरखधंद्यावर चाप बसविण्याचा प्रयत्न केला असता या विभागातील काही भ्रष्ट अधिकाºयांनीच घातक सुपारीचा धंदा करणाºयांना बचावाचा फंडा सांगून या विभागावर दडपण आणण्याचा प्रयत्न चालविला आहे. लोकमतने वेळोवेळी या गोरखधंद्यावर प्रकाशझोत टाकला, हे विशेष!
सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा धंदा करणारे काही व्यापारी आणि त्यांचे दलाल वेगवेगळ्या पद्धतीने आपली डावबाजी करीत असल्याचे आता संबंधित विभागाच्या वरिष्ठांच्या लक्षात आले आहे. नागपूर आणि शहराच्या आजूबाजूलाही मोठ्या प्रमाणावर त्यांनी सडकी सुपारी लपवून ठेवण्यासाठी विशेष व्यवस्था केल्याचे त्यांना कळले आहे. अशाच कळमन्यातील एका गोदामावर मुंबईहून आलेल्या आठ अधिकाºयांच्या चमूने गुरुवारी सायंकाळी कळमना आणि मौद्याच्या टोलनाक्याजवळच्या एका गोदामावर धडक दिल्याची माहिती आहे. बराच वेळ तेथे पाहणी केल्यानंतर अंधार पडल्यामुळे अधिकाºयांच्या या पथकाने संबंधितांना काही सूचना देऊन कारवाई तात्पुरती थांबविल्याची सूत्रांची माहिती आहे. दुसरीकडे कारवाईची दुपारीच कुणकुण लागल्यामुळे दलालांमार्फत काही जणांनी कोट्यवधींची सडकी सुपारी घाईगडबडीत शेतात फेकून दिल्याचे समजते.
विशेष म्हणजे, लोकमतला ही माहिती कळाल्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाचे (एफडीए) सहआयुक्त शशिकांत केकरे यांच्याशी प्रस्तुत प्रतिनिधीने संपर्क साधला असता ते म्हणाले, अशा प्रकारची चर्चा आपण ऐकतो आहे. मात्र, कारवाई कुठली चमू करीत आहे, त्याची आपल्याला माहिती नाही. कुणाकडे कारवाई सुरू आहे, त्याचीही आपल्याला माहिती नसल्याचे केकरे म्हणाले.
काय झाले चौकशी अहवालाचे
विशेष असे की, दोन आठवड्यांपूर्वी वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोदामात प्रारंभी पोलिसांनी २ कोटी, ५४ लाखांची सडकी सुपारी असलेल्या गोदामावर छापा घातला होता. संबंधितांनी वाडी पोलिसांसोबत अर्थपूर्ण चर्चा केल्यामुळे आणि या चर्चेत एफडीएच्या किरण गेडाम नामक अधिकाºयानेही सहभाग नोंदवल्याने सुपारीची कारवाई दडपली गेली. मात्र, लोकमतने हे वृत्त प्रकाशित केल्यानंतर एफडीएच्या वरिष्ठांनी त्याच गोदामावर चार दिवसानंतर पुन्हा छापा घालून तेथे अडीच कोटी रुपयांची सुपारी सील केली. यापूर्वी कारवाईच्या नावाखाली सुपारी खाल्ल्याचा संशय बळावल्याने वाडी पोलिसांची तसेच एफडीए तर्फे गेडामची चौकशी सुरू झाली. हा चौकशी अहवाल अद्याप वरिष्ठांपर्यंत पोहचला नाही. त्या संबंधाने विचारणा केली असता एफडीए आणि पोलीस अधिकारी ‘चौकशी सुरू आहे‘ असे मोघम उत्तर देतात.