'हिंदू तनमन हिंदू जीवन'चे प्रभावी सादरीकरण; वादन आणि नृत्याचा त्रिवेणी संगम
By जितेंद्र ढवळे | Published: August 30, 2023 01:51 PM2023-08-30T13:51:25+5:302023-08-30T13:53:04+5:30
‘तिरंगायन’मध्ये प्रेक्षकांनी अनुभवला गायन
नागपूर : दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची अविस्मरणीय हिंदी कविता ‘हिंदू तनमन हिंदू जीवन’च्या कवी डॉ. उपेंद्र कोठेकर यांनी मराठीत रूपांतरित केलेल्या गीतावरील नृत्याने प्रेक्षकांना देशभक्तीच्या भावनेने ओतप्रोत केले.
राज्य सांस्कृतिक विभाग व अमृत प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वीर शहिदांना अभिवादन आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतींना उजाळा देणारा 'तिरंगायन' हा कार्यक्रम डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला डॉ. उपेंद्र कोठेकर, आ. कृष्णा खोपडे, प्रवीण दटके, विकास कुंभारे तसेच, परिणय फुके, मिलिंद माने, संजय भेंडे, बंटी कुकडे, जयप्रकाश गुप्ता, अरविंद गजभिये, सुधाकर कोहळे, संगीतकार मोरेश्वर निस्ताने आणि अमृत प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिवाकर निस्ताने ही मान्यवर मंडळी उपस्थित होती.
अमृत प्रतिष्ठान, नागपूर निर्मित या प्रेरणादायी देशभक्ती गीतांच्या कार्यक्रमाला मोरेश्वर निस्ताने यांचे उत्तम संगीत लाभले. संगीत संयोजन महेंद्र ढोले यांचे होते. विविध गीतांवर अवंती काटे व सचिन डोंगरे यांच्या चमूने अप्रतिम नृत्य सादर केले.
भारत माता की जय, वंदे मातरम् चा जयघोष यावेळी करण्यात आला. मुकुल पांडे, अमर कुळकर्णी, अंकिता टीकेकर, मोरेश्वर निस्ताने या गायकांनी ‘जंहा डाल डाल पर’, ‘ऐ मेरे प्यारे वतन’, ‘म्यानातून उसळे’, ‘युगांतर’, ‘तुझे सूरज कहू’, ‘कर चले हम फिदा’, ‘ने मजसीने’ आदी गीते उत्कृष्टरीत्या सादर केले. दिवाकर निस्ताने यांनी प्रास्ताविक केले.