दात पाडणाऱ्या आरोपीचा कारावास घटला

By admin | Published: December 21, 2015 03:14 AM2015-12-21T03:14:14+5:302015-12-21T03:14:14+5:30

हल्ला करून एकाचा दात पाडल्याप्रकरणी उमरेडच्या प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्याच्या निकालाविरुद्ध आरोपीने दाखल केलेले अपील ..

The imprisonment of a dentist has reduced | दात पाडणाऱ्या आरोपीचा कारावास घटला

दात पाडणाऱ्या आरोपीचा कारावास घटला

Next

उमरेड जेएमएफसी निकालाविरुद्धच्या अपिलास अंशत: मंजुरी
नागपूर : हल्ला करून एकाचा दात पाडल्याप्रकरणी उमरेडच्या प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्याच्या निकालाविरुद्ध आरोपीने दाखल केलेले अपील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.टी. भालेराव यांच्या न्यायालयाने अंशत: मंजूर केले. आरोपीच्या कारावासाच्या शिक्षेत सहा महिन्याने घट केली. दहा हजार रुपयांचा दंड मात्र कायम ठेवला.
सचिन बंडू सोनडवले असे आरोपीचे नाव असून, तो उमरेड रेल्वे स्थानकनजीकच्या स्लम एरियातील रहिवासी आहे. या आरोपीला उमरेडच्या प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्याच्या न्यायालयाने (जेएमएफसी) १७ एप्रिल २०१३ रोजी एक वर्ष सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती, तर अन्य ११ आरोपींची निर्दोष सुटका केली होती. या शिक्षेविरुद्ध सचिन सोनडवले याने सत्र न्यायालयात अपील दाखल केले होते.
प्रकरण असे, १२ डिसेंबर २००८ रोजी सूरज सखाराम मांडले याला मुलगा झाल्याने सूरज, त्याचे नातेवाईक आणि मित्र मोहल्ल्यात आनंद उत्सव साजरा करीत होते. नाचगाणेही सुरू करण्यात आले होते. आरोपी सचिन सोनडवले आणि त्याचे मित्र नाचगाण्याच्या कार्यक्रमाजवळून जात असताना त्यांनी शिवीगाळ करीत नाचण्यास मनाई केली होती. या प्रकाराने मोठे भांडण उद्भवून सोनडवले आणि त्याच्या साथीदारांनी हल्ला करून तिघांना जखमी केले होते. सूरजच्या तोंडावर जड वस्तूने मारून तोंड फोडले होते आणि समोरचा एक दात पाडला होता. सूरजची आई शांताबाई हिच्या तक्रारीवरून उमरेड पोलिसांनी भादंविच्या १४७, १४८, १४९, ३२५, ३२३, ५०६ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. याबाबतचा खटला उमरेडच्या जेएमएफसी न्यायालयात चालून सचिनला शिक्षा सुनावण्यात आली होती, तर उर्वरित आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली होती. सचिन सोनडवले याने या शिक्षेला सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. या न्यायालयाने एक वर्ष कारावासाची शिक्षा सहा महिन्याच्या कारावासात परिवर्तीत करून दंडाची शिक्षा कायम ठेवली. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील लीलाधर शेंदरे यांनी तर आरोपीच्या वतीने अ‍ॅड. आय.जी. मेश्राम यांनी काम पाहिले.(प्रतिनिधी)

Web Title: The imprisonment of a dentist has reduced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.