मकोकातील आठ आरोपींना कारावास
By Admin | Published: August 6, 2014 01:09 AM2014-08-06T01:09:47+5:302014-08-06T01:09:47+5:30
बहुचर्चित खंडेलवाल ज्वेलर्स दरोडाप्रकरणी संघटित गुन्हेगार कायदा (मकोका) अंतर्गत गुन्हा सिद्ध झाल्याने आठ आरोपींना सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
सराफा दुकानावरील दरोडा प्रकरण : अमरावती न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
अमरावती : बहुचर्चित खंडेलवाल ज्वेलर्स दरोडाप्रकरणी संघटित गुन्हेगार कायदा (मकोका) अंतर्गत गुन्हा सिद्ध झाल्याने आठ आरोपींना सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तीन जणांविरुद्ध कुठलेही ठोस पुरावे न मिळाल्याने त्यांची न्यायालयाने निर्दोष सुटका केली. अमरावती न्यायालयाचे मकोकाचे विशेष न्यायाधीश स. शि. दास यांनी मंगळवारी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. मकोकांतर्गत अमरावती विभागातील हा पहिला शिक्षेचा निकाल ठरला आहे.
स्थानिक जयस्तंभ चौकात दीपक खंडेलवाल यांच्या मालकीचे खंडेलवाल ज्वेलर्स प्रतिष्ठान आहे. या प्रतिष्ठानवर दरोडेखोरांनी ३१ आॅगस्ट २०१० रोजी दुपारी २ वाजता दरोडा घातला. खंडेलवाल यांच्यावर हल्ला करुन दरोडेखोरांनी बंदुकीच्या धाकावर ३२ लाख ९९ हजार १७५ रुपयाचा ऐवज चोरुन नेला होता. पोलिसांनी शिताफीने तपास करुन जनार्दन ऊर्फ जन्या रामराव वाघमारे (२७), अंजली ऊर्फ भारती जनार्दन वाघमारे (२६, दोन्ही रा. भांडेगाव, हिंगोली), रफीक शेख नबी शेख ऊर्फ शेखर प्रकाश पाटील ऊर्फ रॉबर्ट जॉन डीसोजा (३८,रा. मारुतीनगर, ता. राणे बेन्नुर, जि.हवेरी, कर्नाटक), ओमप्रकाश ऊर्फ ओम्या भारत भटकर (२५,रा. भागीरथवाडी, जुना वाशिम), दिलीप ऊर्फ काल्या किसन वाघ (३१,रा. सुलतानपुरा, मोर्शी), नसरीन बानो रफीक शेख (३२, रा. गांधीनगर, ता. हरीहर, जि. दाबनगिरी), तानाजी ऊर्फ तान्या विठ्ठल भोसले ऊर्फ भोळे (३५, रा. बोरखडी, हिंगोली), अनिल भागवत मोहनकर (२५, रा. सिंधी कॅम्प, आळीपुरा, वर्धा), दिलीप ऊर्फ दिल्या रामराव कोरडे (३०, रा. भांडेगाव ,ता. सेंधगाव जि. हिंगोली), शिवाजी विठ्ठल भोसले ऊर्फ भोळे (२८,रा. बोरखडी, ता. शेंदगाव, हिंगोली) व शेख सलीम शेख फरीद (३९, रा. गयबीपुरा, रिसोड) या अकरा आरोपींना अटक केली होती. आरोपींविरुद्ध पोलिसांनी दरोड्यासह मकोका अंतर्गत कारवाई केली.
या घटनेचे दोषारोपत्र पोलिसांनी ४ मार्च २०१२ रोजी येथील मकोकाचे विशेष न्यायाधीश स. शि. दास यांच्या न्यायालयात दाखल केले. याप्रकरणी ६४ साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. यातील सहा साक्षीदार फितूर झाले. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून न्यायधीश दास यांनी मकोका व दरोड्याचा आरोप सिद्ध झाल्याने आरोपी जनार्दन वाघमारे , रफीक शेख व तानाजी भोसले या तिघांना १२ वर्ष सश्रम कारावास तर अनिल मोहनकर, दिलीप वाघ, ओमप्रकाश भटकर या तिघांना १० वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी पाच लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. जनार्दन वाघमारे, रफीक शेख, अनिल मोहनकर, ओमप्रकाश भटकर, तानाजी भोसले, दिलीप किसन वाघ या पाच जणांना मकोका व कट रचण्याप्रकरणी पाच वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी पाच लाख रुपये दंड व दंड न भरल्यास दोन वर्षांचा साधा कारावास तसेच शस्त्राचा वापर केल्याप्रकरणी याच आरोपींना एक वर्षे सश्रम कारावास, पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिन्यांची साधी शिक्षा, नसरीन बानो व अंजली वाघमारे या दोन महिलांना मकोका व चोरीचा माल लपवून ठेवल्याप्रकरणी चार वर्ष सश्रम कारावास, प्रत्येकी दोन लाख रुपये दंड व दंड न भरल्यास नऊ महिने साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली.
सरकारी पक्षाकडून अॅड. विवेक काळे व अॅड. अमर देशमुख यांनी प्रभावी युक्तिवाद केला. त्यांना पोलीस आयुक्तालयाचे विधी अधिकारी अनिल विश्वकर्मा यांची मौलिक मदत मिळाली. (प्रतिनिधी)