तीन अट्टल घरफोड्यांना कारावास

By admin | Published: March 19, 2017 02:59 AM2017-03-19T02:59:43+5:302017-03-19T02:59:43+5:30

घरफोडीच्या तीन वेगवेगळ्या प्रकरणात शनिवारी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एम. आय. लोकवानी यांच्या न्यायालयाने

Imprisonment of three intruding ghouls | तीन अट्टल घरफोड्यांना कारावास

तीन अट्टल घरफोड्यांना कारावास

Next

न्यायालय : मानकापूर भागातील तीन वेगवेगळ््या खटल्यांचा निकाल
नागपूर : घरफोडीच्या तीन वेगवेगळ्या प्रकरणात शनिवारी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एम. आय. लोकवानी यांच्या न्यायालयाने तीन अट्टल घरफोड्यांना एक वर्ष सहा महिन्यांचा सश्रम कारावास आणि प्रत्येकी ३ हजार ५०० रुपये दंड सुनावला.
मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडीचे हे तिन्ही खटले वेगवेगळे चालून वेगवेगळ्या तीन आदेशान्वये आरोपींना ही शिक्षा सुनावण्यात आली. बबलू अंबादास दांडेकर (१९), व्यंकटी ऊर्फ बंटी मारोती दांडेकर आणि सूरज जयराम जाधव (१९), अशी आरोपींची नावे असून ते कोराडी मार्गावरील वॉक्स कूलरमागील श्रीकृष्णधाम झोपडपट्टी येथील रहिवासी आहेत.
पहिली घटना २४ ते २६ सप्टेंबरदरम्यान गायत्रीनगर सचिन सोसायटी येथील कोमल राजेश दुबे यांच्याकडे घडली होती.चोरट्यांनी संधी साधून मुख्य दाराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने, २५०० रुपये रोख, असा एकूण १ लाख ५३ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज लंपास केला होता. तपासा दरम्यान शहर गुन्हे शाखेच्या पथकाने तिन्ही आरोपींना अटक केली होती. पोलीस उपनिरीक्षक के. डी. भगत यांनी तपास करून आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.गुन्हा सिद्ध होऊन न्यायालयाने तिन्ही आरोपींना भादंविच्या ४५४ कलमांतर्गत एक वर्ष सहा महिने सश्रम कारावास, ५०० रुपये दंड, कलम ४५७ अंतर्गत एक वर्ष सहा महिने सश्रम कारावास, ५०० रुपये दंड आणि कलम ३८०, ३४ अंतर्गत एक वर्ष सहा महिने सश्रम कारावास, ५०० रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली. घरफोडीची दुसरी घटना ८ आॅक्टोबर २०१५ रोजी व्यंकटेश एन्क्लेव्ह येथे यश अश्विनकुमार नायडू यांच्याकडे घडली होती. यश नायडू हे इंडस इंड बँकेत व्यवस्थापक आहेत. चोरट्यांनी मुख्य दाराचा कुलूप कोंडा तोडून २५ हजार ७०० रुपये किमतीचे दागिने लंपास केले होते. गुन्हे शाखेच्या पथकाने तिन्ही चोरट्यांना अटक केली होती. सहायक पोलीस निरीक्षक एल. के. हांडे यांनी तपास करून आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात एकूण ६ साक्षीदार तपासण्यात आले. गुन्हा सिद्ध होऊन न्यायालयाने आरोपींना भादंविच्या कलम ४५४ अंतर्गत १ वर्ष सहा महिने सश्रम कारावास, ५०० रुपये दंड आणि भादंविच्या ३८०, ३४ कलमांतर्गत १ वर्ष सहा महिने सश्रम कारावास, ५०० रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली.
घरफोडीची तिसरी घटना १५ जानेवारी २०१६ रोजी गोधनी रोडवरील एमबी टाऊन येथील अर्पण तुषारकांत कटकवार यांच्याकडे घडली होती.चोरट्यांनी मुख्य दाराचा कुलूप कोंडा तोडून रोख २४ हजार, सोने चांदीचे दागिने असा एकूण ७० हजाराचा ऐवज लंपास केला होता. गुन्हे शाखा पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक करून ६१ हजार ३०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला होता. हेड कॉन्स्टेबल बट्टूलाल पांडे यांनी तपास करून आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. गुन्हा सिद्ध होऊन आरोपींना भादंविच्या कलम ४५४ अंतर्गत १ वर्ष सहा महिने सश्रम कारावास, ५०० रुपये दंड आणि भादंविच्या ३८०, ३४ कलमांतर्गत १ वर्ष सहा महिने सश्रम कारावास, ५०० रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली.न्यायालयात सरकारच्यावतीने सरकारी वकील रत्ना घाटे यांनी काम पाहिले. हेड कॉन्स्टेबल रवींद्र वैद्य, नायक कॉन्स्टेबल जीवनलाल गुप्ता यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले.(प्रतिनिधी)

 

Web Title: Imprisonment of three intruding ghouls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.