नागपुरातील कचरा संकलनात सुधारणा करा, अन्यथा कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 10:14 PM2020-02-25T22:14:06+5:302020-02-25T22:15:32+5:30
अनेक भागात दैनंदिन कचरा उचलला जात नाही, अशा तक्रारी आहेत. त्यामुळे आतापर्यंत करण्यात आलेल्या कामाबद्दल दोन्ही कंपन्यांना लेखाजोखा सादर करावा लागणार आहे. कामाचे मूल्यमापन समाधानकारक नसल्यास कारवाई करण्याचे संकेत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील कचरा संकलनात सुधारणा व्हावी. या हेतूने महापालिकेने दोन कंपन्यांवर कचरा संकलनाची जबाबदारी सोपविली. परंतु या दोन्ही कंपन्यांच्या कामाबाबत नागरिक समाधानी नाहीत. अनेक भागात दैनंदिन कचरा उचलला जात नाही, अशा तक्रारी आहेत. त्यामुळे आतापर्यंत करण्यात आलेल्या कामाबद्दल या दोन्ही कंपन्यांना लेखाजोखा सादर करावा लागणार आहे. कामाचे मूल्यमापन समाधानकारक नसल्यास कारवाई करण्याचे संकेत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.
स्वच्छ शहराच्या यादीत अव्वल क्रमांक यावा, यासाठी जनजागृती सुरू आहे. ठिकठिकाणी मोठमोठे फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे कंपन्यांनाही अधिक सजगतेने काम करावे लागत आहे. ए.जी. एनव्हायरो या कंपनीला झोन क्र. १ ते ५ व बीव्हीजी या कंपनीला झोन क्र. ६ ते १० अशा प्रत्येकी पाच झोनची जबाबदारी वाटून देण्यात आली आहे. पहिल्या पाचपैकी तीन झोनमधील अनेक वस्त्यात कचरा संकलनाबाबत तक्रारी आहेत. हनुमाननगर, धंतोली व नेहरूनगर या तीन झोनमधील प्रमुख रस्त्यांवर स्वच्छता केली जाते. परंतु अंतर्गत भागात आजही कचरा संकलनाच्या तक्रारी आहेत. या झोनमधील तक्रारींपेक्षा बीव्हीजी कंपनीबद्दलच्या तक्रारी अधिक आहेत. आसीनगर झोनमध्ये अनेक शिष्टमंडळांनी कंपनीविरुद्ध तक्रारी केल्या आहेत. महापौर व आयुक्तांपर्यंत या तक्रारी गेल्या आहेत. हीच स्थिती सतरंजीपुरा, लकडगंज व मंगळवारी झोनबद्दलही आहे. वर्दळीचा परिसर चकाचक करण्यात येतो. दर्शनीभाग अधिक काळ नजरेसमोर असतो, अशा भागांवर अधिक लक्ष दिले जात आहे. तुलनेत झोपडपट्ट्या व दाटीवाटीच्या भागातील कचरा रोज संकलित करण्यात येत नाही, अशा तक्रारी आहेत. शिवाय, कचरा टाकायचा कुठे, असा प्रश्न या भागातील नागरिकांचा आहे. दोन दिवस कचरा साठविल्यानंतर तिसऱ्या दिवशी कचरा उचलणारी वाहने येतात, अशा बाबीही समोर येत आहेत. त्यामुळे आयुक्तांनी या सर्व बाबींची माहिती घेतल्याचे कळते. कंपनीला आतापर्यंत सात लाखांवर दंडही ठोठावण्यात आला आहे.
विलग संकलनाची व्यवस्था नाही
नागरिकांनी ओला आणि सुका कचरा वेगळा करून द्यावा, असे आवाहन महापालिकेतर्फे वेळोवेळी करण्यात आले आहे. परंतु याला अजूनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. दुसरीकडे कचरा संकलन करणाऱ्या अनेक गाड्यात एकत्रच कचरा संकलित केला जातो. घरातून ओला व सुका कचरा वेगवेगळा दिला जात नाही. दुसरीकडे नागरिकांकडून देण्यात येणारा कचरा तसाच गाडीत टाकण्यात येतो. भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्येही एकत्रित कचरा साठविला जातो.