महाराजबागेतील वाघिणीच्या प्रकृतीत सुधारणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:07 AM2021-05-22T04:07:38+5:302021-05-22T04:07:38+5:30
नागपूर : सर्दी झाल्याने काेराेनाच्या संशयावरून तीन दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलेली महाराजबागेतील जान नावाच्या वाघिणीची प्रकृती आता सुधारत असल्याची ...
नागपूर : सर्दी झाल्याने काेराेनाच्या संशयावरून तीन दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलेली महाराजबागेतील जान नावाच्या वाघिणीची प्रकृती आता सुधारत असल्याची माहिती प्राणीसंग्रहालयाचे संचालक डाॅ. सुनील बावस्कर यांनी दिली. तिची आरटी-पीसीआर टेस्ट निगेटिव्ह आला आणि तिला काेराेना नाही, केवळ सर्दी झाली हाेती, हे निश्चित झाल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला.
शुक्रवारी या वाघिणीला खुल्या पिंजऱ्यात ठेवण्यात आल्याचे डाॅ. बावस्कर यांनी सांगितले. सध्या तिच्या हालचालीवर देखरेख ठेवण्यात येत असून, सात दिवसांत काही संशयास्पद आढळले तर पुन्हा चाचणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उल्लेखनीय म्हणजे १८ मे राेजी वाघिणीच्या नाकावाटे पाणी वाहत असल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. सुस्त हालचाली व जेवणही हाेत नसल्याने महाराजबागेच्या कर्मचाऱ्यांनी हालचाली सुरू केल्या. विशेष म्हणजे हैदराबादमध्ये दाेन सिंहांना संसर्ग झाल्याची बाब लक्षात घेत चिंता वाढली हाेती. त्यामुळे डाॅ. माेटघरे व डाॅ. मयूर काटे यांच्या मदतीने वाघिणीच्या नाकावाटे व घशावाटे स्वॅब घेण्यात आले व एम्सच्या प्रयाेगशाळेत नमुन्यांची तपासणी करण्यात आली. दरम्यान, जानचे नमुने निगेटिव्ह आल्यामुळे सर्वांनी सुटकेचा नि:श्वास साेडला.
दरम्यान, जानची प्रकृती खराब असल्याने इतर औषधाेपचार सुरू करण्यात आल्याचे डाॅ. बावस्कर यांनी सांगितले. सिंहांची देखरेख करणारे डाॅ. हकीम यांच्या मार्गदर्शनात राेगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी व्हिटॅमिनच्या औषधी दिल्या जात आहेत. वाघिणीच्या प्रकृतीत सुधारणा हाेत असून, शुक्रवारी तिने पाेटभर जेवण केल्याचे डाॅ. बावस्कर यांनी सांगितले. तिला खुल्या पिंजऱ्यात साेडण्यात आले. तिच्यावर सात दिवसांपर्यंत देखरेख ठेवण्यात येणार असून काही अनुचित आढळल्यास पुढचे पाऊल उचलण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली.