मनपा शाळांचा दर्जा सुधारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 01:33 AM2017-09-06T01:33:46+5:302017-09-06T01:34:04+5:30
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घडविताना शालेय शिक्षणाबरोबरच त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे. आज महापालिकेच्या शाळांची अवस्था बिकट आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घडविताना शालेय शिक्षणाबरोबरच त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे. आज महापालिकेच्या शाळांची अवस्था बिकट आहे. त्याचा दर्जा सुधारण्यात शिक्षकांची भूमिका ही महत्त्वाची आहे. महापालिकेचे नाव कसे उंचावेल यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजे. महापालिकेच्या शाळेचे नाव देशातील पहिल्या दहा शाळांमध्ये यावे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न आहे. ते स्वप्न नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न मनपाचे शिक्षक करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महापालिकेचा शिक्षक दिन सोहळा विदर्भ साहित्य संघाच्या सांस्कृतिक सभागृहात पार पाडला. यावेळी शिक्षक परिषदेचे आमदार नागो गाणार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, उपसभापती प्रमोद तभाने, स्थापत्य व प्रकल्प समिती सभापती संजय बंगाले, धरमपेठ झोन सभापती रूपा राय, दिव्या धुरडे, राजेंद्र सोनकुसरे, उज्ज्वला बनकर, प्रमिला मंथरानी, नगरसेवक सुनील हिरणवार, उज्ज्वला शर्मा, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, शिक्षक संघटनेचे अध्यक्ष राजेश गवरे प्रामुख्याने उपस्थित होते.
आ. गाणार म्हणाले, मी मनपाच्या शाळेमुळेच घडलो. माझी ओळख निर्माण करून देण्यात मनपाच्या शाळेचे योगदान मोलाचे आहे. शिक्षण विभागाच्या झालेल्या दुर्दशेवर नुसतीच चर्चा न करता त्याला कसे सुधारता येईल यासाठी प्रयत्न करा, असा सल्ला त्यांनी दिला. सध्या खासगी शाळेचे वाढते प्रस्थ हे आपल्यासमोरील आव्हान आहे. त्या आव्हांनाना पेलत शिक्षकांनी आपले कर्तव्य पार पाडत आपल्यावरची जबाबदारी निष्ठेने पार पाडावी. असे केल्यास मनपाच्या शाळांचे स्थान नक्कीच उंचावेल असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने घेतलेले कष्ट हे खरंच दखल घेण्याजोगे आहे. मनपाच्या शाळांचे नाव उंचावण्याचे सामर्थ्य त्यांच्यात असल्याचे सांगितले.या वेळी सहायक शिक्षणाधिकारी कुसुम चापलेकर, क्रीडा निरीक्षक नरेश चौधरी, देशकर आदी उपस्थित होते. संचालन मधु आव्हाड यांनी केले. आभार क्रीडा निरीक्षक नरेश चौधरी यांनी मानले.
आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
शिक्षक दिनाचे औचित्य साधून प्रसंगी मनपाच्या संजयनगर हिंदी माध्यामिक शाळेचे सुधाकर आमधरे, मनीषा मोगलेवार, अशोक चौधरी यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल १२ शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. २०१६-२०१७ या शैक्षणिक सत्रात सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
धाडसी विद्यार्थ्याचा गौरव
३१ जुलै २०१७ ला राजू डोनारकर यांच्याकडे आग लागली होती. तेव्हा दुर्गा नगर माध्यामिक शाळेचा विद्यार्थी अविनाश शेंडे याने धाडस दाखवून त्या घरातील इलेक्ट्रिक स्वीच व सिलेंडरचे कॉक बंद केले. आत अडकलेल्या तीन महिलांना सुखरूप बाहेर काढले. या त्याच्या धाडसाबद्दल त्याचा सत्कार महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते करण्यात आला.