कृत्रिम अवयव प्रत्यारोपणाने दिले बळ

By admin | Published: June 12, 2016 02:43 AM2016-06-12T02:43:49+5:302016-06-12T02:43:49+5:30

एखाद्यावर ओढवलेले अपंगत्व म्हणजे त्याचा केवळ एक अवयव निकामी होत नाही तर अपंगत्व म्हणजे त्या व्यक्तीची ...

Improvisation of the prosthetic limbs | कृत्रिम अवयव प्रत्यारोपणाने दिले बळ

कृत्रिम अवयव प्रत्यारोपणाने दिले बळ

Next

उद्धारने ३००० अपंगांना दिला आधार : शिबिराचा लाभ घ्यावा
नागपूर : एखाद्यावर ओढवलेले अपंगत्व म्हणजे त्याचा केवळ एक अवयव निकामी होत नाही तर अपंगत्व म्हणजे त्या व्यक्तीची जगण्याची उमेद आणि जीवनातील उत्साहच हरविण्याचा क्षण ठरतो. अशा मनातून खचलेल्या दिव्यांगांना गरज आहे ती समाजाने मानसिक आधार देण्याची. नागपूरच्या ‘उद्धार’ या सेवाभावी संस्थेने दिव्यांगांना भक्कम मानसिक आधार देण्याचा वसा उचलला आहे. गेल्या २७ वर्षात संस्थेने तीन हजार पेक्षा जास्त दिव्यांगांना कृत्रिम पायाचा आधार देत सामान्य माणसांप्रमाणे आयुष्य जगण्याचे बळ दिले आहे.
उद्धारचे संस्थापक कुंजबिहारी अग्रवाल यांनी १९८९ मध्ये त्यांच्या वडिलांचे सेवाकार्य पुढे चालविण्यासाठी या संस्थेची स्थापना केली. सभोवताल दिसणाऱ्या अपंगांचे दु:ख समजून त्यांना कृ त्रिम अवयवांचे बळ देण्याचे ध्येयच त्यांनी मनाशी बाळगले आहे. गेल्या २७ वर्षापासून त्यांचे हे सेवाकार्य अहोरात्र सुरू आहे. त्यांची पत्नी व संस्थेच्या अध्यक्ष कुमकुम अग्रवाल यांची त्यांना साथ मिळाले. या कार्यात कृत्रिम पाय तयार करणाऱ्या कोटा, राजस्थानच्या श्री भगवान महावीर विकलांग सहायता समितीच्या तांत्रिक टीमचे मोठे सहकार्य मिळाले. विशेष म्हणजे या टीमचे बहुतेक सदस्य अपंगच आहेत. दोन्ही हाताने अपंग असलेले देवकीनंदन पायाने पेपर लिहिण्याचे काम करतात तर कृत्रिम पाय जोडलेले देवकिशन अतिशय उत्साहाने दिव्यांगांच्या पायाचा साचा तयार करण्याचे काम करतात. या टीमचे कार्यवाहक प्रवीण भंडारी यांनी प्राध्यापकाची नोकरी सोडून या सेवाकार्यात स्वत:ला वाहून घेतले.
ज्या ठिकाणी उद्धारचे शिबिर होते त्या ठिकाणी महावीर विकलांग सहायता समितीची टीम सहभागी होते. येथे येणाऱ्या अपंगांच्या पायाचे माप घेऊन त्याप्रमाणे साचा तयार केला जातो. त्यानंतर साच्याच्या मदतीने प्लास्टिकचा पाय तयार करुन संबंधित अपंगाच्या निकामी पायाला जोडला जातो. पूर्वी पाय तयार करण्याचे काम राजस्थानमध्ये करण्यात येई, मात्र आता नागपुरातच हे काम केले जाते. आठ दिवसात प्रत्यारोपण केल्यानंतर हा माणूस सामान्य माणसासारखा चालू, फिरु किंवा सायकलही चालवू शकतो. पोलिओग्रस्तांना कॅलीपरचा आधार महत्त्वाचा ठरतो. कुंजबिहारी अग्रवाल यांनी सांगितले की, संस्थेने भारतभर शिबिरे घेतली आहेत. येथे येणारे लोक डोळ््यात अश्रू घेवून आणि रांगत येतात. मात्र प्रत्यारोपणानंतर ते उभे राहून हसत घरी जातात.(प्रतिनिधी)

आमदार निवास येथे उद्धारचे शिबिर
उद्धार संस्थेतर्फे शनिवारपासून आमदार निवास, सिव्हिल लाईन्स येथे कृत्रिम पाय जोडण्याचे शिबिर लावण्यात आले आहेत. हे शिबिर रविवारपर्यंत चालणार आहे. पहिल्या दिवशी शंभरच्या जवळपास लोकांनी शिबिराला भेट दिली. ही सेवा संपूर्ण नि:शुल्क असल्याने अपंगांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन अग्रवाल यांनी केले.
आणि तो सायकल चालवित आला
संस्थेच्या कार्याच्या आठवणी सांगताना कुमकुम अग्रवाल यांनी सांगितले की, साकोली जि. भंडारा येथील एक व्यक्ती अशाच एका शिबिरात आमच्याकडे आला होता. एका अपघातात त्याला पाय गमवावा लागला होता. शिबिरात त्याला कृत्रिम पाय लावण्यात आला होता. त्यानंतर वर्षभरानंतर झालेल्या शिबिरादरम्यान त्याने साकोलीवरून १०० किलोमीटर सायकल चालवित येऊन हात जोडल्याचे त्यांनी सांगितले. अशा अनेक भावनिक आठवणी असल्याचे त्या म्हणाल्या.

Web Title: Improvisation of the prosthetic limbs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.