इम्रानने नागपुरात मारला होता बिर्याणीवर ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 10:00 AM2018-07-27T10:00:44+5:302018-07-27T10:07:57+5:30

विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार ते पाकिस्तानचा भावी पंतप्रधानपदापर्यंतचा इम्रान खानचा प्रवास थक्क करणारा आहे.

Imran liked Biryani in Nagpur | इम्रानने नागपुरात मारला होता बिर्याणीवर ताव

इम्रानने नागपुरात मारला होता बिर्याणीवर ताव

Next
ठळक मुद्देविश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार ते पाकिस्तानचा भावी पंतप्रधान थक्क करणारा प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार ते पाकिस्तानचा भावी पंतप्रधानपदापर्यंतचा इम्रान खानचा प्रवास थक्क करणारा आहे. जगभरातील मातब्बर फलंदाजांना वेगवान चेंडूमुळे घाम फोडणारा इम्रान भेदक गोलंदाजीच्या बळावर नवी उंची गाठण्यात यशस्वी ठरला. या खेळाडूचे नागपूर कनेक्शनही जुनेच आहे. १९८७ आणि १९८९ साली इम्रानने दोन वन डे खेळण्यासाठी या शहराचा दौरा केला तेव्हा मोमिनपुऱ्यातील प्रसिद्ध बिर्याणीवर ताव मारला अन् सीताबर्डीवर शॉपिंगही केले होते.
२४ मार्च १९८७ ला पाकने येथे भारताविरुद्ध वन डे खेळला. या सामन्यात नेतृत्व करणाऱ्या इम्रानने ६५ चेंडूत ७३ धावा ठोकल्या होत्या. गोलंदाजीत मात्र १० षटकांत त्याला केवळ रवी शास्त्रीचा बळी घेता आला. अष्टपैलू कामगिरी करणारा वसीम अक्रम सामन्याचा मानकरी ठरला होता.
पाकिस्तान संघ दुसऱ्यांदा इम्रानच्याच नेतृत्वात नागपुरात आला तो ३० आॅक्टोबर १९८९ साली. एमआरएफ नेहरू चषकाचा उपांत्य सामना पाक-इंग्लंड यांच्यात होता. पावसामुळे प्रत्येकी ३०-३० षटकांच्या लढतीत पाकने सहा गड्यांनी बाजी मारली. या सामन्यात रमीझ राजाचा नाबाद ८५ धावांचा तसेच सलीम मलिकचा ६६ धावांचा झंझावात नागपूरचे क्रिकेटप्रेमी अद्याप विसरले नसतील. रमीझने मारलेल्या एक उत्तुंग षटकारावर स्टेडियमबाहेर आॅल सेंट चर्चपर्यंत चेंडू गेल्याच्या आठवणीला त्यावेळी आयोजनात असलेल्या व्हीसीए पदाधिकाऱ्यांनी उजाळा दिला.
हा सामना जिंकल्यानंतरही इम्रानने आपल्या सहकाऱ्यांची कानउघाडणी केली होती. इम्रानचा संघात असा दरारा होता की, जेव्हा तो झापायचा तेव्हा सहकारी त्याच्या नजरेला नजर भिडवीत नसत. ‘कप्तान’ या टोपण नावाने प्रसिद्ध असलेला इम्रान सहकाऱ्यांमध्ये विजिगिषुवृत्ती जागविण्यातही माहीर होता, असे त्या सामन्यात स्कोअरिंग करणारे चंद्रशेखर कारकर यांनी सांगितले.
नंतर वेस्ट इंडिजला अंतिम सामन्यात नमवून पाकिस्तानने ही स्पर्धाही जिंकली. देशासाठी इम्राने जिंकून दिलेले हे पहिले जेतेपद होते. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा सन्मानही अर्थात इम्रानच्या वाट्याला आला होता.
त्यावेळी सिव्हिल लाईन्सच्या विदर्भ क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सामने खेळविले जायचे. शेजारीच असलेल्या रविभवन परिसरात उभय संघांची निवास व्यवस्था असायची. सुरक्षेचा फारसा त्रास नसल्याने अनेक पाहुणे खेळाडू मोमिनपुरा भागातील बिर्याणीचा आस्वाद घेण्यासाठी जायचे. पाकिस्तानचे खेळाडूदेखील याला अपवाद नव्हते. कपिल देव आणि इम्रान खान यांच्यात इतकी घट्ट मैत्री होती की, दोघेही मैदानाबाहेर अनेकदा सोबत वावरायचे. सीताबर्डीवर खरेदीच्या निमित्ताने अनेक खेळाडूंना मार्केटचा फेरफटका मारून आणण्याची जबाबदारी त्यावेळी पी.टी. लुले यांच्याकडे असायची.
८८ कसोटी तसेच १७५ वन डेतून कौशल्य दाखविणाऱ्या इम्रानने अनेकदा स्वत:ची भूमिका कशी योग्य आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो वादग्रस्तही ठरला, पण डगमगला नाही. पाकिस्तानच्या राजकारणात इतिहास नोंदवण्याआधी, इम्रान खानने क्रिकेटमध्ये पाकिस्तानला विश्वचषक जिंकून दिला होता. १९९२ साली इम्रान खानच्या पाकिस्तान संघाने अंतिम फेरीत इंग्लंडवर मात केली. अंतिम सामन्यात इम्रानने फलंदाजी व गोलंदाजीतही स्वत:ची छाप पाडली. फलंदाजीदरम्यान पाकिस्तानचे पहिले दोन फलंदाज अवघ्या २४ धावांमध्ये माघारी परतले होते. यानंतर इम्रान खानने जावेद मियांदादसोबत १३९ धावांची भागीदारी रचत पाकिस्तानच्या संघाच्या विजयाची पायाभरणी केली. अखेरच्या षटकात इंग्लंडला विजयासाठी २३ धावा हव्या होत्या. यावेळी इम्रानने अखेरचे षटक टाकण्याची जबाबदारी आपल्याकडे घेतली. रिचर्ड इलिंगवर्थला बाद करत इम्रानने पाकच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. विश्वचषक जिंकताच त्याने वन-डे क्रिकेटमधून निवृत्तीही जाहीर केली होती.

Web Title: Imran liked Biryani in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.