Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!
By मंगेश व्यवहारे | Published: November 26, 2024 09:23 AM2024-11-26T09:23:32+5:302024-11-26T09:26:00+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बसपा, वंचित या पक्षांच्या उमेदवारांवर यंदा जमानत जप्तीची वेळ आली आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024: काँग्रेससाठी किलर ठरणारे नागपूर बसपा, वंचित या पक्षांच्या उमेदवारांवर यंदा जमानत जप्तीची वेळ आली आहे. यंदा निवडणुकीत हे फॅक्टर अपक्षांपेक्षाही कमकुवत ठरले असून, अपक्ष उमेदवारापेक्षा या पक्षांच्या मतांच्या टक्केवारीत प्रचंड घसरण झाली आहे. उलट जिल्ह्यातील काही मतदारसंघांत अपक्ष थेट लढतीत होते.
विधानसभेच्या निवडणुकीत यंदाही बहुजन समाज पक्ष, वंचित बहुजन आघाडी या पक्षांचे उमेदवार काँग्रेसच्या उमेदवाराला विजयापासून रोखू शकतात, अशी शक्यता निवडणुकीपूर्वी व्यक्त केली जात होती.
जिल्ह्यातील १२ ही मतदारसंघांत वंचित व बसपाने आपले उमेदवार उभे करून प्रचारही जोरदार केला होता. मात्र, उत्तर नागपूर विधानसभेचा उमेदवाराचा अपवाद वगळता एकाही उमेदवाराला पाचअंकी आकडा गाठता आला नाही.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे निवडणुकीपूर्वी ताकदीने मैदानात उतरल्यामुळे मनसेचे उमेदवार लढतीत रंगत आणेल, अशी अपेक्षा होती. मात्र, पूर्व नागपूर मतदारसंघात मनसेच्या उमेदवाराने सर्वाधिक २२६१ मते घेतली. काही मतदारसंघांत उमेदवार तीन आकड्यांतच गुंडाळले.
केवळ १.०१ टक्के मतदान
जिल्ह्यातील १२ ही विधानसभा मतदारसंघांत मनसे, वंचित, बसपा यांच्यासह किरकोळ पक्षांना मिळालेल्या मतांची आकडेवारी १.०१ टक्के असून, अपक्षांना मिळालेल्या मतांची टक्केवरी ८.५ टक्के आहेत. याचाच अर्थ हे राजकीय पक्ष जिल्ह्यात प्रभावहीन ठरले असून, काँग्रेससाठी यंदा यांची कुठलीही डोकेदुःखी दिसून आली नाही.