१४ महिन्यात रेल्वेचे १६ कोच ठरविण्यात आले बाद, २५ वर्षांच्या सेवेनंतर केले स्क्रॅप
By नरेश डोंगरे | Published: July 29, 2023 04:36 PM2023-07-29T16:36:42+5:302023-07-29T16:37:26+5:30
स्क्रॅपच्या माध्यमातून पावणेदोन कोटींचे उत्पन्न
नरेश डोंगरे
नागपूर : कोट्यवधी प्रवाशांना तब्बल २५ वर्षे सेवा देणाऱ्या नागपूर विभागातील विविध मेल, एक्सप्रेसचे १६ कोच यंदा 'बाद' ठरविण्यात आले. त्यांना वेगळे करत रेल्वे प्रशासाने हे सर्व १६ कोच स्क्रॅपमध्ये काढले.
रोज हजारो प्रवाशांना बसवून त्यांना त्यांच्या त्यांच्या प्रवासाच्या ठिकाणी नेऊन सोडणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये जे कोच (डबे) असतात. या प्रत्येक डब्याच्या सेवेचा कालावधी जास्तीत जास्त २५ वर्षे असतो. तथापि, वेळोवेळी प्रत्येक कोचचे सुक्ष्म निरीक्षण करून तो कोच प्रवाशी वाहतुकीसाठी योग्य आहे की नाही, हे तपासले जाते. जर तो कोच डॅमेज झाला असेल किंवा त्याची सेवा जास्तीत जास्त २५ वर्षे झाली असेल तर अशा कोचला निकामी ठरवून भंगारात काढले जाते. डब्यांना नष्ट करण्यासाठी किंवा त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी एक समिती नेमण्यात येते. रेल्वेच्या धोरणाअंतर्गत या डब्यांची पाहणी आणि उपयुक्तता संपल्याचा अहवाल ही समिती देत असते. ही समिती त्यांचा अहवाल रेल्वे बोर्डाकडे सादर करते आणि नंतर बाद (निकामी) ठरविण्यात आलेल्या डब्यांना भंगारात काढण्याची प्रक्रिया सुरू होते.
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात एप्रिल २०२२ ते जून २०२३ या कालावधीत विविध मेल, एक्सप्रेसच्या १६ कोचला बाद ठरवून वेगळे करण्यात आले. त्यांना भंगारात काढून रेल्वे प्रशासनाने या १६ कोचच्या विक्रीतून १ कोटी, ७३ लाखांवर महसूल मिळवला.
वर्षभरात ११, तीन महिन्यांत ५ गेल्या वित्तीय वर्षांत अर्थात एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ पर्यंत ११ कोच बाद ठरविण्यात आले. त्यातून रेल्वेने १ कोटी, १९ लाख रुपये मिळवले तर गेल्या एप्रिल ते जून २०२३ या तीन महिन्यात ५ कोच बाद ठरवून त्याच्या विक्रीतून रेल्वेने ५४ लाख रुपये मिळवले.