चिमुकल्या प्रज्ञानचे प्रसंगावधान, वडिल अन् बहिणीचे वाचले प्राण
By निशांत वानखेडे | Published: April 30, 2024 06:25 PM2024-04-30T18:25:45+5:302024-04-30T18:29:13+5:30
देव तारी त्यालाा काेण मारी : अपघातात तीन पलट्या मारून शेतात घुसली हाेती कार
नागपूर : सकाळच्या सुमारास वळणावर अनियंत्रित झालेली गाडी तीन काेलांट्या घेत रस्त्यावरून शेतात घुसली. रस्त्यावर तेव्हा वर्दळही नव्हती. गाडी चालविणारे वडील डाेक्याला दुखापत झाल्याने बेशुद्ध पडले. दाेन बहिणीही अत्यवस्थ हाेत्या. अशावेळी सुखरूप असलेला ७ वर्षाचा प्रज्ञान कसाबसा कारमधून बाहेर पडला, रस्त्यावर आला अन् लाेकांना मदतीची याचना करू लागला. त्याचे प्रसंगावधान कामी आले आणि एकएक करीत जमलेल्या लाेकांनी जखमींनी रुग्णावाहिकेतून नागपूरकडे रवाना केले.
ही घटना २२ एप्रिल राेजी कुही राेडवरील लांजळा गावाच्या वळणावर घडली हाेती. राजेंद्र वाघमारे हे दिघाेरी येथील रहिवासी व याच भागात त्यांचे इलेक्ट्रानिक्स वस्तुंचे दुकान आहे. त्या दिवशी राजेंद्र हे एका ग्राहकाचा टिव्ही आणि हाेम थिएटर घेऊन कुहीला पाेहचविण्यासाठी आपल्या सफारी गाडीने सकाळी निघाले हाेते. मुलांनीही येण्याचा हट्ट धरला म्हणून या कामातच कुहीला राहणाऱ्या नातेवाईकांच्या घरीही जाता येईल या विचाराने मुलगा प्रज्ञान, मुलगी महेक व पुतणी उन्नती यांनाही साेबत घेतले.
गाडी डाेंगरगाव पार करून लांजळा गावाजवळ असताना अचानक राजेंद्र यांना चक्कर आल्यासारखी वाटू लागली आणि समाेरच असलेल्या वळणावर गाडी अनियंत्रित झाली आणि काेलांट्या खात शेतातील खड्ड्यात पडली. रस्त्यावर तेव्हा वाहने नसल्याने कुणालाही याची कल्पना नव्हती. त्यात राजेंद्र वाघमारे हे बेशुद्ध पडले व मुलीसुद्धा अत्यवस्थ झाल्या हाेत्या. अशा भीषण परिस्थितीत शुद्धीवर असलेल्या प्रज्ञानने प्रसंगावधान राखले. त्याने वडिलांचा माेबाईल घेतला आणि गाडीचा दरवाजा उघडून कसाबसा बाहेर पडला. रस्त्यावर येऊन लाेकांना थांबविले, पप्पांचा अपघात झाला, मदत करा अशी याचना करू लागला. थांबलेली माणसे लगेच गाडीकडे धावली. प्रज्ञानने त्यातील एकाला माेठ्या वडिलांना फाेन लावण्याची विनंती केली. लाेकांनी सर्व जखमींना बाहेर काढले आणि रस्त्यावर आणले.
सुदैवाने याचा मार्गाने कुहीकडून नागपूरला जाणारी रुग्णवाहिका तिथे पाेहचली. सर्व जखमींना त्यात बसवून नागपूरला रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता दाेन्ही बहिणी धाेक्याच्या बाहेर असून राजेंद्र वाघमारे यांच्या पायाला दुखापत आहे. प्रज्ञान तिथेच रडत बसला असता अन मदतीला उशीर झाला असता तर कदाचित अनर्थ घडला असता. प्रज्ञानमुळे त्याचे वडील आणि बहिणीचेही प्राण वाचले. त्याच्या प्रयत्नाचे आता सर्वत्र काैतुक हाेत आहे.