विकास कामात हलगर्जीपणा झाल्यास कंत्राटदारांसोबत अधिकाऱ्यांवरही कारवाई
By कमलेश वानखेडे | Published: May 5, 2023 05:06 PM2023-05-05T17:06:41+5:302023-05-05T17:07:22+5:30
Nagpur News कामात हलगर्जीपणा झाला तर कंत्राटदारासोबत अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरून कारवाई केली जाईल, असा इशारा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिला.
कमलेश वानखेडे
नागपूर : प्रकल्पांच्या तसेच विकास कामांच्या दर्जाबाबत कुठलिही तडजोड
नको. दर्जा कायम राखम्यासह कामे मुदतीत पूर्ण होण्यासाठी त्याचा
पाठपुरावा करणे ही अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. कामात हलगर्जीपणा झाला तर
कंत्राटदारासोबत अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरून कारवाई केली जाईल, असा
इशारा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिला.
नागपूरमधील विकासकामांवर चर्चा करण्यासाठी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या
अध्यक्षतेखाली शुक्रवारी नागपूरमध्ये आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस
आ. प्रवीण दटके, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, महापालिका आयुक्त
राधाकृष्णन बी., नासुप्रचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी यांच्यासह अधिकारी
उपस्थित होते.
सदर बैठकीत रेशीमबाग मैदानाचा विकास, स्वदेश दर्शन योजनेंतर्गत वाकी,
धापेवाडा, पारडसिंगा व गिरड तीर्थक्षेत्रांचा विकास, परमात्मा एक सेवक
प्रकल्प, वर्धमान नगर येथील आयनॉक्स, बिग बझार प्रकल्पाबाबत नियोजन,
पश्चिम आणि उत्तर नागपूरातील रस्त्यांची कामे, पूनापूर –भरतवाडा येथील
वीट भट्टी प्रकल्प, नागपूर सुधार प्रन्यास नवीन इमारत तसेच नासुप्रच्या
व्यावसायिक कॉम्प्लेक्स अशा अनेक प्रकल्पांच्या विकासकामांचा आढावा
घेण्यात आला.
यावेळी गडकरी यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. ते म्हणाले, विकास
योजनांसाठी वापरला जाणारा पैसा हा जनतेचा पैसा आहे. अधिकाऱ्यांनी
कुणाचाही मुलाहिजा न करता कामाच्या दर्जाबबात काटेकोर राहिले पाहिजे, असे
निर्देशही त्यांनी दिले.
हलबा जात प्रमाणपत्र पडताळणीतील अडचणी सोडवा
हलबा समाजाच्या कर्मचाऱ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणीमध्ये येणाऱ्या
अडचणी लक्षात घेता त्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याबाबत या वेळी गडकरी
यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.