दिवाळीत पहा खंडग्रास सूर्यग्रहण! पाहताना काळजी घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2022 08:00 AM2022-10-13T08:00:00+5:302022-10-13T08:00:07+5:30
Nagpur News यंदा दिवाळीत अंतराळातील घटनेचा अद्भूत याेग साधून आला आहे. लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे २५ ऑक्टाेबर राेजी अमावास्येला सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका रेषेत येणार असून त्यामुळे सूर्याचा काही भाग चंद्राद्वारे झाकला जाईल.
नागपूर : यंदा दिवाळीत अंतराळातील घटनेचा अद्भूत याेग साधून आला आहे. लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे २५ ऑक्टाेबर राेजी अमावास्येला सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका रेषेत येणार असून त्यामुळे सूर्याचा काही भाग चंद्राद्वारे झाकला जाईल. हे खंडग्रास सूर्यग्रहण असेल. मात्र ग्रहण पाहताना माेठी काळजी घेण्याचे आवाहन अवकाश अभ्यासकांनी केले आहे.
२५ ऑक्टोबर रोजी सूर्य, चंद्र आणि पृथ्वी जवळजवळ एकाच रेषेत असतील. परिणामी चंद्र सूर्याला अंशतः झाकून काही काळासाठी आंशिक सूर्यग्रहण निर्माण करेल. या विशिष्ट ग्रहण दरम्यान पृथ्वीवर कुठेही संपूर्ण सूर्यग्रहण(खग्रास) होणार नाही कारण चंद्राच्या छायेने सूर्य पूर्णपणे झाकला जाणार नाही. त्याऐवजी सूर्य चंद्रकोर आकार घेतो असे दिसेल. २०२२ सालचे हे दुसरे खंडग्रास सूर्यग्रहण आहे. ते युरोप, उत्तर आफ्रिका, मध्य पूर्व आणि आशियाच्या पश्चिम भागातून दिसेल. नागपूरसह देशाच्या बहुतांश भागातून ते दिसणार आहे. केवळ पूर्वाेत्तर राज्य वगळता, कारण त्यावेळी तिकडे सूर्य मावळतीला आलेला असेल.
काय घ्याल काळजी ?
- डाेळ्याला इजा पाेहचण्याची शक्यता असल्याने ग्रहण पाहताना काळजी घेण्याचे आवाहन रमन विज्ञान केंद्राचे खगाेल शिक्षक महेंद्र वाघ यांनी केले.
- ग्रहण उघड्या डाेळ्यांनी पाहू नये. तसेच एक्स-रे फिल्म, साधे चष्मे किंवा पाण्यात परावर्तित करूनही पाहू नये.
- दुर्बिनचा वापर करूनही ग्रहण पाहू नये.
- त्याऐवजी साैर चष्म्यांचा वापर करणे फायद्याचे असेल.
- या ग्रहणाबाबत कुठलाही अंधविश्वास बाळगण्याची काही गरज नाही.
रमन विज्ञान केंद्रात व्यवस्था
नेहमीप्रमाणे यावेळी रमन विज्ञान केंद्र व तारामंडळ तर्फे खंडग्रास सूर्यग्रहण पाहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. प्राेजेक्शनद्वारे सूर्यग्रहण पाहण्याची व्यवस्था करण्यात आली असून अधिकाधिक विद्यार्थ्यांनी याचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन महेंद्र वाघ यांनी केले.