गुजरातमध्ये आदिवासींची मते काँग्रेसलाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2022 07:40 PM2022-12-06T19:40:14+5:302022-12-06T19:41:16+5:30
Nagpur News आदिवासींची गठ्ठा मते काँग्रेसच्याच खात्यात आली आहेत. गुजरातमधील निकाल वेगळाच असेल, असा दावा काँग्रेसचे गुजरात निवडणुकीतील स्टार प्रचारक व अ. भा. आदिवासी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवाजीराव मोघे यांनी केला.
नागपूर : गुजरातमधील आदिवासींना तेथील राज्य सरकारच्या कुठल्याही योजनेचा फायदा मिळाला नाही. उलट तेथे पेसा कायदा बंद करण्यात आला. तेथील आदिवासी भाजपच्या सत्तेवर नाराज होता. आदिवासींची गठ्ठा मते काँग्रेसच्याच खात्यात आली आहेत. वृत्त वाहिन्या दाखवित असलेले एक्झिट पोल आपल्याला मान्य नाही. निकाल वेगळाच असेल, असा दावा काँग्रेसचे गुजरात निवडणुकीतील स्टार प्रचारक व अ. भा. आदिवासी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवाजीराव मोघे यांनी केला.
मोघे म्हणाले, मध्य व दक्षिण गुजरातच्या आदिवासीबहुल भागात आपण प्रचारासाठी फिरलो, जाहीर सभा घेतल्या, गावागावांत बैठका घेतल्या. गुजरातमधील २७ मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत, तर २२ मतदारसंघांत आदिवासींची मते ५० हजारांपेक्षा जास्त आहेत. तेथील आदिवासी भाजपवर कमालीचा नाराज असल्याचे दिसून आले. आदिवासींसाठी असलेल्या योजना एजंट मार्फत राबविण्यात आल्या. त्यामुळे आदिवासींना प्रत्यक्षात याचा लाभच मिळाला नाही. या मतदारसंघांमध्ये काँग्रेसला भरीव मतदान झाले आहे. त्यामुळे एक्झिट पोलमध्ये दाखविण्यात येत असलेल्या आकड्यांपेक्षा काँग्रेसला जास्त जागा मिळतील, असा दावा त्यांनी केला.