जानेवारीत आरोग्य विभागाची जाहिरात काढणार; आरोग्यमंत्र्यांची घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2022 09:24 PM2022-12-26T21:24:23+5:302022-12-26T21:24:57+5:30
Nagpur News आरोग्य विभागाची बिंदुनामावली तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, जागा भरण्यासाठी जानेवारीमध्ये जाहिरात काढणार असल्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले.
नागपूर : आरोग्य विभागाची बिंदुनामावली तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, जागा भरण्यासाठी जानेवारीमध्ये जाहिरात काढणार असल्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले. कंत्राटी तत्त्वावरील एमबीबीएस वैद्यकीय अधिकाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेतले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या दरात वाढ करण्यासाठी आरोग्य विभागाच्या सचिवांची समिती नेमून अहवाल आल्यानंतर निर्णय घेतला जाईल, असेही एका उपप्रश्नाला उत्तर देताना सावंत यांनी सांगितले.
खुलताबाद येथील ट्रॉमा सेंटरला मान्यता
सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत, शिवाय खुलताबादसह दौलताबाद, वेरूळ, म्हैसमाळ, सुलीभंजन ही पर्यटन आणि धार्मिक स्थळे आहेत. यामुळे खुलताबाद येथे ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्यात येईल, अशी घोषणा आरोग्यमंत्री सावंत यांनी केली. सतीश चव्हाण, विक्रम काळे यांनी यासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
शासनाकडे प्रस्ताव न पाठविणाऱ्या अधिकाऱ्याचे निलंबन
सोलापुरात नवीन आरोग्य केंद्राचे परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यास विलंब करण्यात आला. २०१९ पासून सातत्याने शासनाकडून प्रस्ताव मागण्यात येत आहे. मात्र, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांनी उत्तर दिले नाही. त्यांचे लगेच निलंबन करण्यात येत असून, त्यांची चौकशी केली जाईल, असेदेखील सावंत यांनी सांगितले.