चाकूचे घाव घालत दगडाने ठेचून गुंडाने केली गुन्हेगाराची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2022 10:37 AM2022-03-16T10:37:15+5:302022-03-16T11:14:48+5:30
दोघांत वाद झाला. आरोपीने रागारागात भुऱ्यावर चाकूने वार केले. जीव वाचविण्यासाठी भुऱ्या पळू लागला. आरोपी बेडेवारने त्याचा पाठलाग करून त्याला दगड फेकून मारला. त्यामुळे भुऱ्या खाली पडला. आरोपीने त्याला दगडाने ठेचून ठार मारले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दारूच्या नशेत गुंड मित्राला चिथावणी देणे एका तरुणाच्या जीवावर बेतले. गुंडाने चाकूने भोसकून आणि दगडाने ठेचून त्याची हत्या केली.
कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी दुपारी ही घटना घडली. भुऱ्या ऊर्फ विक्रांत हरिभाऊजी बंडगर (वय २५) असे मृताचे नाव असून, त्याची हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव गण्या ऊर्फ गणेश शालीकराम बेडेवार (३५) आहे.
आरोपी बेडेवार हा ऑटोचालक असून, गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. भुऱ्या हासुद्धा गुंड प्रवृत्तीचा होता. त्याच्यावर हल्ला, विनयभंग आणि चोरीचा गुन्हा दाखल होता. डिप्टीसिग्नल, कळमना परिसरातील आरटीओ ऑफिसच्या जवळ प्रकाशनगरात हे दोघे राहायचे. ओळख असल्याने ते नेहमी सोबत दारू प्यायचे.
मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास ते गोपालनगरात दारू पीत बसले. त्यांच्यासोबत आणखी एक मित्र होता. दारू पिताना भुऱ्याने आरोपी बेडेवारला उकसावले. तेरे भांजे का मर्डर हो गया.. तूने क्या कर लिया’ असे म्हणून भुऱ्याने आरोपीला हिणवणे सुरू केले. त्यावरून दोघांत वाद झाला. आरोपीने तावात येऊन भुऱ्यावर चाकूने वार केले. जीव वाचविण्यासाठी भुऱ्या पळू लागला. आरोपी बेडेवारने त्याचा पाठलाग करून त्याला दगड फेकून मारला. त्यामुळे भुऱ्या खाली पडला. आरोपीने त्याला दगडाने ठेचून ठार मारले.
परिसरात प्रचंड तणाव
या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. त्या भागातील नागरिक मोठ्या संख्येत जमल्याने परिस्थिती चिघळण्याचे संकेत मिळाले. तेवढ्यात कळमन्याचे ठाणेदार विनोद पाटील आपल्या ताफ्यासह तेथे पोहोचले. त्यांनी बेडेवारला अटक केली. तो दारूच्या नशेत होता. पोलीस उपायुक्त मनीष कलवानिया रात्रीपर्यंत कळमना ठाण्यात चाैकशी करीत होते.