नागपूरमध्ये सीसीटीव्हीमुळे अट्टल वाहनचोर झाला गजाआड
By योगेश पांडे | Published: May 11, 2023 03:36 PM2023-05-11T15:36:21+5:302023-05-11T15:37:16+5:30
दोन दिवसांअगोदर धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील यशवंत स्टेडियमजवळून चंद्रशेखर तेलगोटे यांची दुचाकी चोरी गेली होती.
नागपूर : शहरातील विविध भागांमध्ये वाहनचोरी करणाऱ्या अट्टल वाहनचोराच्या मुसक्या आवळण्यात नागपूर पोलिसांना यश आले आहे. सीसीटीव्हीच्या फुटेजमधून त्याचा हा प्रताप समोर आला. धंतोली पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.
दोन दिवसांअगोदर धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील यशवंत स्टेडियमजवळून चंद्रशेखर तेलगोटे यांची दुचाकी चोरी गेली होती. त्यांनी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून परिसरातील सीसीटीव्ही तपासले. सीसीटीव्हीमध्ये चोरटा निलेश जनक परिहार (३२, जिजामाता नगर, वाठोडा) हा दुचाकी नेतांना दिसून आला. त्यानंतर पोलिसांनी आणखी सर्व्हेलन्स कॅमेरे तपासले तसेच खबऱ्यांच्या माध्यमातून त्याची माहिती मिळविली. पोलिसांनी त्याला सापळा रचून ताब्यात घेतले. त्याला चोरीबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.
पोलीसी खाक्या दाखविताच त्याने धंतोलीतील चोरीची कबुली दिली. सोबतच सिताबर्डी, अजनी, नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतूनदेखील दुचाकी चोरी केल्याचे सांगितले. त्याच्या ताब्यातून चार दुचाक्या जप्त करण्यात आल्या आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके, विश्वजीत फरताडे, सुभाष वासाडे, बाळू जाधव, विनोद चव्हाण, रोशन रिठे यांच्या पथकाने ही कारवाई केली.