नागपुरात पब-जीच्या नादात गेला बळी, पंप हाऊसमध्ये पडून विद्यार्थ्याचा मृत्यू
By योगेश पांडे | Published: June 12, 2024 05:13 PM2024-06-12T17:13:31+5:302024-06-12T17:14:07+5:30
पुलकीत राज शहदादपुरी (१६, दयानंद महाविद्यालयाजवळ, जरीपटका) असे मृतकाचे नाव आहे. मंगळवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास तो त्याचा मित्र ऋषी प्रेम खेमानी (१७) याच्यासोबत नाश्ता करण्यासाठी शंकरनगरला गेला होता.
योगेश पांडे - नागपूर
नागपूर : पहाटेच्या सुमारास नाश्ता करण्यासाठी निघालेल्या विद्यार्थ्याचा पब-जी खेळण्याच्या नादात दुर्दैवी मृत्यू झाला. अंबाझरी तलावाच्या पंप हाऊसच्या होलमध्ये पडून तो बुडाला. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
पुलकीत राज शहदादपुरी (१६, दयानंद महाविद्यालयाजवळ, जरीपटका) असे मृतकाचे नाव आहे. मंगळवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास तो त्याचा मित्र ऋषी प्रेम खेमानी (१७) याच्यासोबत नाश्ता करण्यासाठी शंकरनगरला गेला होता. दुकान उघडायचे असल्याने आता काय करावे या विचारातून ते टाईमपास करण्यासाठी अंबाझरी तलावाजवळ पोहोचले. तेथील पंपहाऊसजवळ बसून ते दोघेही पब-जी हा मोबाईल गेम खेळू लागले. गेम खेळून झाल्यावर ते परत निघाले असता पुलकीतला पंप हाऊसचे होल दिसलेच नाही व तो त्यात पडला. तेथील पाण्यात तो बुडाला. ऋषीने पोलिसांना याची माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत काही तरुणांच्या मदतीने त्याला बाहेर काढले व मेयो इस्पितळात त्याला नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. योगेश शहदादपुरी यांच्या सूचनेवरून अंबाझरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.