फोर्ड कारचालकाने धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर
By दयानंद पाईकराव | Published: January 1, 2024 01:37 PM2024-01-01T13:37:03+5:302024-01-01T13:37:07+5:30
दुचाकीखाली पडल्यामुळे इंगोले यांच्या डाव्या पायाला व डोक्याला गंभीर दुखापत झाली
नागपूर : फोर्ड कार चालकाने धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना वाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत रविवारी २४ डिसेंबरला रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली. मनिष गोपालराव इंगोले (वय ३०, रा. हिलटॉप कॉलनी, आठवा मेल) असे गंभीर जखमी झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे.
ते आपली दुचाकी क्रमांक एम. एच. ४०, सी-१११७ ने अमरावती रोडवर वेणा टर्निंग दत्तवाडी या मार्गाने घरी परत जात होते. तेवढ्यात फोर्ड कार क्रमांक ९७८५ च्या चालकाने आपल्या ताब्यातील कार भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून इंगोले यांच्या दुचाकीला धडक दिली. अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून फरार झाला. दुचाकीखाली पडल्यामुळे इंगोले यांच्या डाव्या पायाला व डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांनी खासगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर रविवारी ३१ डिसेंबरला दिलेल्या तक्रारीवरून वाडी पोलिसांनी कार चालकाविरुद्ध कलम २७९, ३३८, सहकलम १३४, १७७ नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.