नागपूर जिल्ह्यात पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही
By गणेश हुड | Published: October 22, 2024 06:57 PM2024-10-22T18:57:19+5:302024-10-22T18:57:59+5:30
Nagpur : बारा विधानसभा मतदारसंघात इच्छुकांकडून ४६२ अर्जांची उचल
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवापासून उमेदवारी अर्ज मिळण्यास व स्विकारण्यास सुरुवात झाली आहे. निवडणूक प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी नागपूर जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघात एकही उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. तर इच्छुकांकडून ४६२ अर्जांची उचल करण्यात आली.
विधानसभा निवडणुकीच्या नामनिर्देशन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करावयाच्या पहिल्या दिवशी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील काटोल विधानसभा मतदारसंघात २८ इच्छुकांनी अर्ज नेले. सावनेर मधून १८, हिंगणा २४, उमरेड ३५, कामठी २९ तर रामटेक मतदार संघासाठी १८ अर्जांची उचल करण्यात आली. नागपूर शहरातील नागपूर दक्षिण-पश्चिम मधून ४१, नागपूर दक्षिण ३८, नागपूर पूर्व ४७, नागपूर मध्य ९९, नागपूर पश्चिम ३३ तर नागपूर उत्तर मधून ५२ अर्जांची उचल करण्यात आली.
महाराष्ट्रातील विधानसभेच्या एकूण २८८ जागांसाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. २२ ऑक्टोबरपासून अर्ज दाखल करायचे आहेत. त्यानुसार मंगळवारी पहिल्या दिवशी जिल्ह्यात एकही अर्ज दाखल झाला नाही, उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख २९ ऑक्टोबर असून, ३० ऑक्टोबरला अर्जांची छाननी होणार आहे. अर्ज माघारी घेण्याची मुदत ४ नोव्हेंबरपर्यंत आहे.