धक्कादायक! नागपूर विभागात ९५६ महिलांची घरातच प्रसूती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2022 11:15 AM2022-03-05T11:15:04+5:302022-03-05T11:17:25+5:30

नागपूर विभागात एप्रिल ते मार्च २०२१ या वर्षात १ लाख ९० हजार ४८७ गर्भवती मातांची नोंदणी झाली. यातील १ लाख ६० हजार ६१२ गर्भवतींची प्रसूती विविध रुग्णालयात झाली. तर ९५६ प्रसूती घरात झाली.

In Nagpur division over 956 woman gave birth to child in home | धक्कादायक! नागपूर विभागात ९५६ महिलांची घरातच प्रसूती

धक्कादायक! नागपूर विभागात ९५६ महिलांची घरातच प्रसूती

Next
ठळक मुद्देमाता व बाल मृत्यूचे प्रमाण कसे होणार कमी

सुमेध वाघमारे

नागपूर : पूर्वीच्या काळी घरातच सुईणी प्रसूती करायच्या. त्यावेळी माता मृत्यू व नवजात अर्भकांचा मृत्यूदर फार जास्त होता. तो कमी करण्यासाठी व प्रसूती रुग्णालयातच करण्यासाठी सरकारच्या विविध योजना सुरू करण्यात आल्या. यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च होत असतानाही मागील वर्षी नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये ९५६ प्रसूती या घरीच झाल्या. यामुळे माता व बालमृत्यूचे प्रमाण रोखणार कसे, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

प्रसूतीदरम्यान कधी रक्तस्त्राव होईल, किती जास्त होईल हे कोणी सांगू शकत नाही. कोणत्याही प्रकारची गुंतागुंत हाताळायला कोणीच सज्ज नसतात. रक्तसाठापासून ते तज्ज्ञ व्यक्तीही नसतात. यामुळे प्रत्येक प्रसूती रुग्णालयातच व्हावी आणि माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान, प्रधानमंत्री मातृवंदन योजना, जननी शिशू सुरक्षा योजना आदी राबविण्यात येतात. परंतु या योजनांची काटेकोर अंमलबजावणी होत नसल्यामुळेच घरात प्रसूतीचे प्रमाण मोठे असल्याचे चित्र आहे.

नागपूर विभागात एप्रिल ते मार्च २०२१ या वर्षात १ लाख ९० हजार ४८७ गर्भवती मातांची नोंदणी झाली. यातील १ लाख ६० हजार ६१२ गर्भवतींची प्रसूती विविध रुग्णालयात झाली. तर ९५६ प्रसूती घरात झाली. यामुळे सुरक्षित प्रसूतीवर विविध योजनांच्या माध्यमातून होणारा कोट्यवधीचा खर्चाचे ऑडिट होणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक, ८०९ प्रसूती घरीच

गडचिरोली जिल्ह्यात मागील वर्षी १९ हजार ५७५ गर्भवती महिलांची नोंदणी झाली. यातील १६ हजार १२३ प्रसूती विविध रुग्णालयात झाल्या. तरीही ८०९ प्रसूती घरीच झाल्या आहेत. नागपूर विभागातील सहा जिल्हे मिळून घरी झालेल्या एकूण प्रसूतीच्या तुलनेत हे प्रमाण ८४ टक्के आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात ४६ तर, नागपूर जिल्ह्यात ४१ प्रसूती घरातच

गडचिरोली जिल्ह्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक प्रसूती घरात झाल्या. या जिल्ह्यात ३१ हजार ८९७ गर्भवती मातांची नोंदणी झाली असताना २५ हजार १३४ प्रसूती रुग्णालयांमध्ये तर ४६ प्रसूती घरात झाल्या आहेत. नागपूर जिल्ह्यात ८४ हजार ३३६ गर्भवती मातांच्या नोंदणीत ७१ हजार २८८ प्रसूती रुग्णालयांमध्ये तर ४१ प्रसूती घरात झाल्या आहेत. भंडारा व वर्धा जिल्ह्यात प्रत्येकी २५ तर गोंदिया जिल्ह्यात १० प्रसूती घरात झाल्या आहेत.

घरात प्रसूती धोकादायकच

विविध योजना व गावखेड्यांतही आता प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय असताना घरातच प्रसूती होणे धोकादायक आहे. या मागे कोरोनाची दुसरी लाट व आर्थिक संकट हे एक असू शकेल. ग्रामीण भागात आशा वर्कर खूप चांगले काम करीत आहेत. परंतु कधी कधी त्यांचाही नाईलाज होतो. यामुळे सरकारने यात आणखी लक्ष घालणे आणि माता व बालमृत्यू रोखण्यासाठी घरातील प्रसूती शून्यावर आणणे गरजेचे आहे.

- डॉ. सुषमा देशमुख, उपाध्यक्ष, स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ संघटना

-नागपूर विभागात घरी झालेल्या प्रसूती

गडचिरोली जिल्हा : ८०९

चंद्रपूर जिल्हा : ४६

नागपूर जिल्हा : ४१

भंडारा जिल्हा : २५

वर्धा जिल्हा : २५

गोंदिया जिल्हा : १०

Web Title: In Nagpur division over 956 woman gave birth to child in home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.