नागपुरात भरऊन्हातही हुडहुडी; पारा अधिक तरी झाेंबतोय गारठा!
By निशांत वानखेडे | Published: December 14, 2023 07:53 PM2023-12-14T19:53:56+5:302023-12-14T19:54:42+5:30
थंडीला खऱ्या अर्थाने आता सुरुवात झाली असे म्हणायला हरकत नाही
निशांत वानखेडे, नागपूर: हिवाळी अधिवेशनामुळे नागपूरचे राजकीय, सामाजिक वातावरण तापले आहे, पण वाढलेल्या गारठ्याने लाेकांना हुडहुडी भरली आहे. कमाल तापमान सरासरीत व किमान तापमान सरासरीच्या वर असले तरी झाेंबणारा गारठा मात्र जाणवत आहे. त्यामुळे थंडीला खऱ्या अर्थाने आता सुरुवात झाली, असे म्हणायला हरकत नाही.
आकाशातून ढगांची गर्दी हटल्यानंतर वातावरणातील दव अधिक सक्रिय झाले आहे. गेल्या चार-पाच दिवसात गारठा अधिक वाढल्याची जाणीव हाेत आहे. दिवसा तापमान सरासरीत आहे. गुरुवारी २८.९ अंश तापमानाची नाेंद करण्यात आली, जी सरासरीपेक्षा अंशत: कमी आहे. रात्रीचा पारा १४.८ अंशावर असून सरासरीच्या १ अंश अधिक आहे. तापमान सरासरीत असले तरी वातावरण मात्र थंड झाले आहे. त्यामुळे दिवसा उन्हाची किरणे हवीहवीशी वाटत आहेत. रात्रीही बाेचरी थंडी जाणवत आहे. उष्ण कपड्याशिवाय बाहेर पडणे आजाराला आमंत्रण देण्यासारखे आहे.
विदर्भात ब्रम्हपुरी, यवतमाळ, बुलढाण्यात कमाल तापमान ३० अंशाच्या वर आहे तर इतर ठिकाणी २८ अंशाच्या खाली आहे. गाेंदियात सर्वात कमी २७.२ अंशाची नाेंद झाली. तापमान घसरत असल्याचे वाटत असले तरी ते सरासरीच्या स्तरात आहे. त्यामुळे दिवसाची अपेक्षित थंडी अद्याप जाणवली नाही. दरवर्षी डिसेंबरमध्ये जशी असते तसा अनुभव जाणवला नाही आणि हा संपूर्ण महिना याच स्थितीत राहिल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. कदाचित शेवटच्या आठवड्यात गारठा अधिक वाढेल, असा अंदाज आहे. भारतीय समुद्री क्षेत्रा कुठल्याही वादळाची स्थिती नाही. त्यामुळे पुढे पावसाचीही शक्यता नगण्य आहे. उत्तर भारतात किमान तापमान एकांकी अंकावर पाेहचले आहे. मात्र दरवर्षी उत्तरेकडील वातावरणाचा पडणारा प्रभाव यंदा जाणवत नाही आहे. त्यामुळे पुढच्या दिवसात थंडीची तीव्रता वाढेल का, याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे.