तब्बल दीड तास उपचारापासून रुग्ण वंचित, मेडिकलमधील ‘सर्व्हर डाऊन’
By सुमेध वाघमार | Published: March 12, 2024 05:32 PM2024-03-12T17:32:35+5:302024-03-12T17:34:16+5:30
ना केसपेपर निघाले, ना शुल्क भरता आले.
सुमेध वाघमारे,नागपूर : गरीब व सामान्य रुग्णांसाठी आशेचे किरण ठरलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) मंगळवारी दुपारी अचानक ‘सर्व्हर डाऊन’ झाल्याने तब्बल दीड तास रुग्ण उचपारापासून वंचित राहिले. बाह्यरुग्ण विभागामधील हजारो रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागला. आलेल्या रुग्णांमध्ये काही रुग्ण हे गंभीर आजाराने त्रस्त होते.
मेडिकलमध्ये ‘ऑनलाईन केसपेपर’ दिला जातो. सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत बाह्यरुग्ण विभागामध्ये रुग्णांची गर्दी असते. दररोज दोन ते अडीच हजार रुग्ण बाह्यरुग्ण विभागात येतात. मंगळवारी दुपारी १२.५ वाजता अचानक ‘सर्व्हर डाऊन’ झाले. यामुळे केसपेपर काढण्याची यंत्रणाच ठप्प झाली. त्यावेळी दोनशेहून अधिक रुग्ण रांगेमध्ये उभे होते. ही यंत्रणा ठप्प झाल्यामुळे रुग्णांची गर्दी वाढली. अर्ध्या तासाहून जास्त वेळ झाल्यानंतर उपाययोजना होत नसल्याचे पाहत रुग्णांच्या नातेवाईकांनी केसपेपर काढणाºयांना जाब विचारला. परंतु त्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिले. काही तर चक्क मोबाइलमध्ये रिल्स पाहण्यात गुंतून गेले. तिथे उपस्थित परिचारिका यात लक्ष घालण्यास तयार नव्हत्या. केसपेपर काढण्याच्या खिडकीत परिचारिकांचे काय काम, हे न उलगडणारे कोडे आहे. कोणेची लक्ष देत नसल्याचे पाहत काही रुग्ण व नातेवाईक आक्रमक झाले. जवळपास दीड तास हा गोंधळ सुरू होता. अखेर वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांना याची माहिती मिळताच त्यांनी तातडीने आॅफलाईन केसपेपर काढण्याचा सूचना दिल्या.
रुग्णांना वेठीस धरण्याचा हा प्रकार - रुग्णांच्या एका नातेवाईकाने ‘लोकमत’ला सांगितले, ‘सर्व्हर डाऊन’ झाल्यानंतर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. परंतु दीड तासानंतर ‘आॅफलाईन’चा सूचना येणे हा रुग्णांना वेठीस धरणार प्रकार आहे. मेडिकलमध्ये ‘सर्व्हर डाऊन’ होण्याचा प्रकारही नवीन नाही.
विविध चाचण्यांसाठी खोळंबले रुग्ण- ‘सर्व्हर डाऊन’ झाल्याने ६६क्रमांकाच्या खिडकीवर विविध चाचण्यांचे शुल्क भरता येत नव्हते. त्यामुळे तिथेही रुग्ण व नातेवाईकांची रांग लागली होती. रक्त तपासणीपासून ते ईसीजी, एक्स-रे, एमआरआय, सीटी स्कॅनसाठी रुग्ण खोळंबून होते.
नेट बंद पडल्याने ‘सर्व्हर डाऊन’ - अचानक नेट बंद पडल्याने ‘सर्व्हर डाऊन’ झाले. परंतु याची माहिती मिळताच ‘ऑफलाईन’ करून केसपेपर व शुल्क भरण्याच्या खिडकी सुरू करण्याचा सूचना दिल्या. ‘नेट’पूर्ववत सुरू होताच ‘आॅनलाईन’ केसपेपर काढणे व शुल्क भरणे सुरू झाले. या दरम्यान रुग्णसेवा प्रभावित झाली नाही. या संदर्भात रुग्ण किंवा नातेवाईकांचीही तक्रार मिळाली नाही.-डॉ. अविनाश गावंडे, वैद्यकीय अधीक्षक मेडिकल