कडेकोट बंदोबस्त अन सीसीटीव्हीच्या देखरेखीत पोलीस भरतीला सुरुवात
By योगेश पांडे | Published: June 19, 2024 05:22 PM2024-06-19T17:22:37+5:302024-06-19T17:22:59+5:30
२०२२-२३ च्या पोलीस व कारागृह विभागाच्या भरतीप्रकियेतील शारीरिक चाचणीला बुधवारपासून सुरुवात झाली.
योगेश पांडे, नागपूर : २०२२-२३ च्या पोलीस व कारागृह विभागाच्या भरती प्रकियेतील शारीरिक चाचणीला बुधवारपासून सुरुवात झाली. पोलीस लाईन टाकळीच्या मैदानात सुरू झालेल्या या प्रक्रियेसाठी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सीसीटीव्हीच्या देखरेखीत प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या दोन्ही विभागांच्या ६०२ जागांसाठी एकूण ८५ हजार २८४ अर्ज आले आहेत.
नागपूर पोलीस मुख्यालयातर्फे पोलिस शिपायांच्या ३४७ व कारागृह विभागाच्या २५५ जागांसाठी भरतीप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. बुधवारपासून याला सुरुवात झाली. पोलीस शिपाईपदांसाठी एकूण २९ हजार ९८७ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यात ७ हजार ७१३ महिला आहेत. तर कारागृहातील भरतीसाठी ५५ हजार २९७ अर्ज मिळाले असून, त्यात १५ हजार ६१८ महिला आहेत. पोलीस शिपाई, चालक, सशस्त्र पोलीस शिपाई, कारागृह विभाग शिपाई पदांसाठी सुरू झालेल्या या भरतीत पारदर्शक पद्धतीने प्रक्रिया राबविण्यावर भर देण्यात आला आहे.
पहिल्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन सत्रांत शारीरिक चाचणी घेण्यात आल्या. परिसरात वैद्यकीय अधिकाऱ्यांची चमूदेखील तैनात होती.
असे आहे नियोजन-
बुधवारी सकाळी भरतीला प्रारंभ झाला. प्रमाणपत्र तपासणी, छाती उंचीचे मोजमाप आणि शंभर मीटर धाव शर्यत झाल्यावर पुढील प्रक्रिया असेल. उमेदवारांना १६०० आणि ८०० मीटर धाव पूर्ण करावी लागेल. बायोमेट्रिक पद्धतीने ओळख पटल्यावर प्रवेशद्वारामधून मैदानात प्रवेश देण्यात येत आहे. भरतीवर लाच लुचपत प्रतिबंधक विभाग ,पोलीस गुप्तचर विभाग यासह सीसीटीव्ही, व्हिडीओ कॅमेरे यांची करडी नजर राहणार आहे
तृतीयपंथी देखील मैदानात-
यंदाच्या या भरतीत तृतीयपंथी देखील पोलीस होण्यासाठी इतरांशी मुकाबला करणार आहे. पोलीस विभाग व कारागृह विभागासाठी प्रत्येकी पाच तृतीयपंथी उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.