नागपूरमध्ये विद्यार्थ्यांचे शुल्क स्वत:च्या घरात, महिला लिपीकाकडून ११ लाखांची अफरातफर

By योगेश पांडे | Published: May 7, 2023 05:07 PM2023-05-07T17:07:00+5:302023-05-07T17:08:30+5:30

स्नेहा प्रवीण अंबर्ते उर्फ स्नेहा मारोतीराव खराते असे आरोपी लिपीक महिलेचे नाव आहे.

In Nagpur, students' fees in their own homes, 11 lakhs fraud by female clerks | नागपूरमध्ये विद्यार्थ्यांचे शुल्क स्वत:च्या घरात, महिला लिपीकाकडून ११ लाखांची अफरातफर

नागपूरमध्ये विद्यार्थ्यांचे शुल्क स्वत:च्या घरात, महिला लिपीकाकडून ११ लाखांची अफरातफर

googlenewsNext

नागपूर : खाजगी शाळांकडून अव्वाच्या सव्वा शुल्क आकारल्या जात असून एकप्रकारे लूटच सुरू असल्याची ओरड पालकांकडून होत असते. मात्र एका महिला लिपीकाने चक्क शाळेलाच चुना लावल्याची घटना नागपुरात घडली आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांनी भरलेले शुल्क स्वत:जवळच ठेवत महिलेने ११ लाखांहून अधिक रकमेची अफरातफर केली. हा घोटाळा करून लिपीक फरार झाली असून पोलीस शोध घेत आहेत.

स्नेहा प्रवीण अंबर्ते उर्फ स्नेहा मारोतीराव खराते (३४, वृंदावन नगर) असे आरोपी लिपीक महिलेचे नाव आहे. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. एस.पी.पब्लिक स्कूल, उमरेड मार्ग येथील शाळेत स्नेहा कॅशिअर व लिपीक अशी दोन्ही कामे करायची. पालकांकडून येणारे शुल्क स्वीकारणे व ते शाळेच्या खात्यात किंवा अध्यक्षांकडे सुपूर्द करण्याची तिच्याकडे जबाबदारी देण्यात आली होती. सर्व लेखाजोखादेखील तीच सांभाळायची. १८ जून २०२२ ते ५ एप्रिल २०२३ या कालावधीत स्नेहाने विद्यार्थ्यांच्या पालकांकडून नियमितपणे शुल्क स्वीकारले. त्यातील ११ लाख १३ हजार रुपये तिने शाळेच्या बॅंक खात्यात किंवा शाळेच्या अध्यक्षांकडे जमा न करता स्वत:जवळच ठेवले.

काही विद्यार्थ्यांचे शुल्क आले नसल्याची बाब शाळेच्या निदर्शनास आली. त्यावेळी पालकांना विचारणा करण्यात आली असता ही बाब उघडकीस आली. शाळेचे अध्यक्ष संजय पेंढारकर (५४, आराधनानगर) यांनी वाठोडा पोलीस ठाण्यात तक्रा नोंदविली. त्यांच्या तक्रार अर्जाच्या प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी आरोपी स्नेहाविरोधात गुन्हा नोंदविला आहे. पोलीस तिचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे पालकांमध्ये संतापाचे वातावरण असून शुल्क दिल्यानंतर त्याची अफरातफर होत असेल तर ती शाळेची जबाबदारी आहे, अशी भूमिका पालकांनी घेतली आहे.

Web Title: In Nagpur, students' fees in their own homes, 11 lakhs fraud by female clerks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर