नागपुरात डेंग्यू संशयित रुग्णांनी वाढविला ‘ताप’, २२४ डेंग्यू पॉझिटीव्ह रुग्णांची नोंद
By सुमेध वाघमार | Published: September 1, 2023 05:11 PM2023-09-01T17:11:02+5:302023-09-01T17:11:40+5:30
महिन्याभरात २,८४२ संशयित रुग्ण
नागपूर :डेंग्यूमुळेनागपूरची जनता चांगलीच गारद झाली आहे. एकट्या ऑगस्ट महिन्यात डेंग्यू संशयित रुग्णांची संख्या २ हजार ८४२ वर पोहचली असून याच महिन्यात २२४ डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे.
एक डास माणसांची किती दाणादाण उडवतो आणि व्यवस्था कोलमडून टाकतो, याचा अनुभव नागपुरकर अनुभवत आहे. डेंग्यूवर अद्यापही स्पष्ट उपचार नाहीत. आजार गंभीर झाल्यास थेट मृत्यूचा धोका संभवतो. यामुळे डेंग्यूवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रत्येकाचे प्रयत्न आवश्यक आहे. परंतु घरात कोणाला डेंग्यू होत नाही तोपर्यंत अनेक जण याला गंभीरतेने घेत नसल्याचे चित्र आहे.
- आतापर्यंत ३७५ डेंग्यू रुग्ण
जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यात शहरात डेंग्यूचे ३७५ रुग्णांची नोंद झाली आहे. यात १० टक्के संशयित रुग्ण असून त्यांची संख्या ३ हजार ७१७ आहे.
- ३,०६३ घरांमध्ये डेंग्यूचा अळ्या
मनपाच्या हिवताप व हत्तीरोग विभागाच्या पथकाने ऑगस्ट महिन्यात १ लाख २३ हजार ३१४ घरांची तपासणी केली. यात ३ हजार ६३ घरांमध्ये डेंग्यू डासांच्या अळ्या आढळून आल्या.
- ३०८ घरांना बजावली नोटीस
ज्या घरांमध्ये पुन्हा पुन्हा तपासणी केल्यावर डेंग्यू डासाच्या अळ्या आढळून आल्या त्या घरांना नोटीस बजावण्यात येत आहे. ऑगस्ट महिन्यात मनपाने अशा ३०८ घरांना नोटीस बजावली आहे.