व्यवसायाच्या वादातून वैदूचा खून; पंचधार शिवारात आढळला मृतदेह, तिघे ताब्यात
By जितेंद्र ढवळे | Published: February 7, 2023 09:19 PM2023-02-07T21:19:00+5:302023-02-07T21:20:04+5:30
तीन आराेपी पाेलिसांच्या ताब्यात
नागपूर/खापरखेडा : जडीबुटी विकण्याच्या व्यवसाय करणाऱ्या दाेन वैदूंमधील अंतर्गत वाद विकाेपास गेला आणि एकाने त्याच्या मित्रांच्या मदतीने दुसऱ्याचा खून करून मृतदेह पंचधार (ता. काटाेल) शिवारात पुरला. ही घटना साेमवारी (दि. ३० जानेवारी) रात्री रात्री घडली असून, मंगळवारी (दि. ७) दुपारी उघडकीस आली. या प्रकरणात पाेलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.
दिलीप चंदन ढेरावण (४५, रा. वाई, ता. काटाेल) असे मृताचे नाव आहे. सचिन दहाट (४२) व केवल सुखदेव कोठे (२५) दाेघेही रा. लिंगा (सावळी), ता. काटाेल या दाेघांना पाेलिसांनी चाैकशीसाठी ताब्यात घेतले असून, या प्रकरणात अजय पंजाबगीर साेलंकी (२४, रा. वाई, ता. काटाेल), मुजम्मील खान, रितेश इंगाेले व सूरज ठाकूर यांचाही समावेश आहे. दिलीप व अजय एकाच गावचे रहिवासी असून, जडीबुटी विकण्याचा व्यवसाय करायचे. ठरल्याप्रमाणे अजय व त्याच्या मित्रांनी दिलीपला ३० जानेवारीला सावनेर शहरातील संकेत लाॅजवर बाेलावले. तु नकली जडीबुटीचा धंदा करीत असल्याचे म्हणत त्यांनी दिलीपला १० लाख रुपयांची मागणी केली. शिवाय, पाेलिसांना सांगण्याची धमकीही दिली.
मुजम्मील व सूरजने दिलीपला मारहाण करीत चारचाकी वाहनात बसविले व गंगालडाेह (ता. काटाेल)च्या जंगलात आणले. तिथेही त्याला बेदम मारहाण करण्यात आली. रितेश व केवल माेटरसायकलने तिथे पाेहाेचले. त्यावेळी चार लाख रुपये देण्याचे दिलीपने मान्य केले. त्याचवेळी त्याचा मृत्यू झाला आणि केवलने ही माहिती अजयला फाेनवर दिली. पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने अजय, केवल, सचिन व सूरज यांनी पंचधारच्या जंगलातील तलावाकाठी खड्डा खाेदून मृतदेह पुरवला. त्याची माेटरसायकल सावनेरहून आणून लिंगा (सावळी) येथील विहिरीत टाकली. पाेलिसांनी हितेश बन्साेड, रा. सावनेर यांच्या मदतीने दिलीप मृतदेह खड्ड्यातून बाहेर काढला व उत्तरीय तपासणीसाठी नागपूरला आणला.
दिलीपला लुटण्याचा बनाव
या व्यवसायात दिलीप चांगला पैसा कमावत असल्याने अजयने त्याला लुटण्याचा कट रचला. ताे लाेकांशी खाेटे बाेलून अधिक पैसे उकळत असल्याचे सांगून त्याला लुटण्याचा बनाव करून ती याेजना केवलला सांगितली. रितेश इंगाेले सावनेर शहरातील संकेत लाॅज चालवित असून, त्या दाेघांनी रितेशशी त्याच्या लाॅजमध्ये या याेजनेबाबत चर्चा केली. या चर्चेत मुजम्मील, सचिन, रितेश व सूरज सहभागी झाले हाेते. दिलीप नेहमी काेराडी (ता. कामठी) येथे ये-जा करीत असल्याचेही अजयला माहिती हाेते.