क्षणार्धात राखमिश्रीत पाण्याची लाट शिरली आणि घरांची ‘राखरांगाेळी’ झाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2022 09:53 PM2022-07-20T21:53:17+5:302022-07-20T21:55:50+5:30

Nagpur News काेराडी वीज केंद्रातील राख साचविलेल्या तलावाचा बंधारा फुटल्यामुळे पाच-सहा किलाेमीटरच्या परिसरात त्याचे भीषण परिणाम झाले. म्हसाळा टाेलीवासीयांना राखमिश्रीत पुराचा तडाखा बसला.

In no time, a wave of water mixed with ash entered and the houses became 'Ash Rangaeli' | क्षणार्धात राखमिश्रीत पाण्याची लाट शिरली आणि घरांची ‘राखरांगाेळी’ झाली

क्षणार्धात राखमिश्रीत पाण्याची लाट शिरली आणि घरांची ‘राखरांगाेळी’ झाली

googlenewsNext
ठळक मुद्देम्हसाळा टाेलीवासीयांच्या वेदनाकपडेलत्ते, अन्नधान्य सारे वाहून गेलेकाेराडी वीज केंद्रातून आलेली आपत्ती

 निशांत वानखेडे/मेहा शर्मा

नागपूर : वस्तीतील कर्ते पुरुष मंडळी कामावर गेली हाेती, घरी केवळ बायाबापडे अन् चिल्लेपिल्ले तेवढे राहिले हाेते. दुपारी ३ वाजेची वेळ असेल. लागून असलेल्या नाल्यातील पाण्याचा माेठा लाेंढा वस्तीत शिरला आणि काही कळण्याच्या आत सारं काही उद्ध्वस्त करून गेला. घरात कमरेभर साचलेल्या पाण्यात अन्नधान्य, तेलमीठ, कपडेलत्ते, अंथरून-पांघरून, भांडीकुंडी सारं काही तरंगत हाेते. कुणाला सावरण्याचा वेळच मिळाला नाही. बायाबापडे चिमुकल्यांना घेऊन जीव मुठीत घेऊन सैरभैर धावत सुटले. जगदंबानगर, म्हसाळा टाेलीत राहणाऱ्या नागरिकांनी अनुभवलेली १६ जुलैची ती घटना सांगताना आजही त्यांच्या अंगावर काटा उभा राहिला.

काेराडी वीज केंद्रातील राख साचविलेल्या तलावाचा बंधारा फुटल्यामुळे पाच-सहा किलाेमीटरच्या परिसरात त्याचे भीषण परिणाम झाले. म्हसाळा टाेलीवासीयांना राखमिश्रीत पुराचा तडाखा बसला. या वस्तीत रेल्वे रुळाला लागून दीडशेच्यावर कुटुंब राहतात. बहुतेक लाेक हातमजुरी व घरकाम करणारे आहेत. यातील १३ कुटुंबाचे संसारच पुराने उद्ध्वस्त केले. दुपारी ३ वाजता पुराचे पाणी वस्तीत शिरले तेव्हा लाेकांना सावरण्यालाही वेळ मिळाला नाही. घरात कमरेएवढे पाणी भरले हाेते. घरातील सर्व सामान पाण्यावर तरंगत नाल्यामध्ये वाहून गेले. घरात असलेल्या महिला व माणसे लहान मुलांना घेऊन जीव वाचवित उंचावरील रेल्वे रुळाकडे धावले.

पाणी ओसरेपर्यंत तब्बल पाच-सहा तास लाेक रेल्वे रुळाच्या कडेला बसून हाेते. शाळेत गेलेली मुले नाल्याच्या दुसऱ्या बाजूला बसून हाेती. अन्नधान्य, कपडेलत्ते वाहून गेल्याने पाेटात खायलाही काही उरले नाही. काही लाेक मुलांना घेऊन नातलगांकडे गेले तर काहींनी उपाशीपाेटी जागूनच रात्र काढली. दुसऱ्या दिवशी सकाळीच घरी जाता आले. मात्र पाणी ओसरल्यानंतरही घरांमध्ये राखेचा दीड फूट गाळ साचला हाेता. हा चिखल काढतच संपूर्ण दिवस गेला. या राखमिश्रीत पुरात सर्वस्व गमावलेल्या सुजाता साेनटक्के, माेहम्मद गुलजार, इंदिरा अशाेक भाेयर, मुरलीधर ठवकर, नैना संताेष समुद्रे, शांती तामसिंग मडावी, राजेश विश्वकर्मा, संताेष परते, नुरजहां खातून, कांता भाऊराव पाटील यांनी डाेळ्यातील पाणी पुसत लाेकमतजवळ व्यथा मांडली.

चार दिवसांनंतरही राखेचा गाळ

चार दिवस लाेटल्यानंतरही वस्तीत पुराचा चिखल आणि घरात राखेचा गाळ साचला आहे. या पुरामुळे घर पडलेल्या प्रल्हाद बडगुजर यांच्या घरात अजूनही राखेचा गाळ पसरलेला आहे. हा चिखल तुडवित, दुर्गंधी सहन करीतच दिवस काढावा लागताे आहे.

लाेक आले, मदत नाही

पुराच्या तिसऱ्या दिवशी म्हसाळा ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी व काही अधिकाऱ्यांनी येऊन सर्वेक्षण केले. मात्र अद्याप काेणतीही मदत मिळाली नाही. उसनवारी करूनच लाेक माेडलेला संसार उभा करीत आहेत.

Web Title: In no time, a wave of water mixed with ash entered and the houses became 'Ash Rangaeli'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :floodपूर