नाेव्हेंबरला दिवसागणिक घसरेल पारा, वाढेल थंडी; दशकाच्या ट्रेंडनुसार १० अंशांवर जाईल तापमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2022 11:28 AM2022-11-03T11:28:09+5:302022-11-03T11:29:10+5:30
पुढचा आठवडाभर असेच वातावरण राहणार आहे. त्यानंतर मात्र तापमान घसरेल व थंडीचा जाेर वाढेल
नागपूर : देशात साधारणत: नाेव्हेंबर महिन्यात थंडीला सुरुवात हाेते. अर्धा महिना कमाल व किमान तापमान सरासरीतच असते व त्यानंतर पारा घसरताे. गेल्या दशकभरात नाेव्हेंबरमध्येच थंडीने सतावले आहे. हा ट्रेंड यावेळीही कायम राहणार, असे संकेत आताच मिळत आहेत. सध्या दिवसाचे तापमान ३० अंश व रात्रीचे तापमान १६ ते १७ अंशांच्या सरासरीत असून, रात्री गारवा जाणवताे आहे. पुढचा आठवडाभर असेच वातावरण राहणार आहे. त्यानंतर मात्र तापमान घसरेल व थंडीचा जाेर वाढेल, अशी शक्यता आहे.
हवामान विभागाच्या दशकभराच्या अभिलेखानुसार नाेव्हेंबर महिन्यातही थंडीचा तडाखा जाणवला आहे. मात्र, पंधरवड्यानंतर थंडी अधिक तीव्र हाेती. केवळ २०१६ व २०२० मध्ये १० तारखेपासूनच त्याची जाणीव झाली. या काळात दिवसाचे तापमान अधिक व रात्रीचे तापमान कमी असते. मात्र, ऑक्टाेबरप्रमाणे उन्हाचा त्रास या महिन्यात हाेत नाही. पहिल्या १० दिवसांनंतर दिवसाचाही पारा घसरत जातो. या महिन्यात अवकाळी पावसाची शक्यता असते व सरासरी १६ मि.मी. हाेते. मात्र, १९४६ साली नाेव्हेंबरमध्ये तब्बल १६२.३ मि.मी. पावसाची नाेंद झाली हाेती.
याच वर्षी २० तारखेला २४ तासांत ८१.५ मि.मी. पाऊस झाला हाेता. यावेळी तशी शक्यता दिसून येत नाही. सरासरी कमाल तापमान ३०.९ अंश, तर रात्रीचे तापमान १५.८ अंश असते. ७ नाेव्हेंबर १९७७ साली सर्वाधिक ३५.६ अंश कमाल तापमान, तर १९१२ साली ३० नाेव्हेंबरला पारा ६.७ अंशापर्यंत घसरला हाेता. २०१२ पासून दशकभरात २०१६ साली सर्वांत कमी ९.८ अंश किमान तापमानाची नाेंद १० नाेव्हेंबरला झाली. काही वर्षांत ते १० ते ११ अंशांपर्यंत पाेहोचले आहे.
दशकभरात नाेव्हेंबरमध्ये सर्वांत कमी तापमान
वर्ष - २०१२ - २०१३ - २०१४ - २०१५ - २०१६ - २०१७ - २०१८ - २०१९ - २०२० - २०२१
किमान पारा - १०.२ - ११.१ - ११.१ - १४.४ - ९.८ - १०.४ - ११ - १४.२ - ११.५ - १२.४
तारीख - १७ - २१ - १९ - २१ - १० - २६ - २७ - २६ - १० - २८