एका दिवसात, एका रेल्वे स्थानकावर २८१ विनातिकीट प्रवासी

By नरेश डोंगरे | Published: June 11, 2024 08:04 PM2024-06-11T20:04:20+5:302024-06-11T20:04:59+5:30

नागपूर-मुंबई मार्गावर अचानक तिकीट तपासणी.

In one day, 281 ticketless passengers at one railway station | एका दिवसात, एका रेल्वे स्थानकावर २८१ विनातिकीट प्रवासी

एका दिवसात, एका रेल्वे स्थानकावर २८१ विनातिकीट प्रवासी

नागपूर: मध्य रेल्वेकडून अचानक सोमवारी एका रेल्वे स्थानकावर तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत वैध तिकिटांशिवाय प्रवास करताना २८१ प्रवासी आढळले. त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारून रेल्वे प्रशासनाने पावणेदोन लाखांचा दंड वसूल केला. रेल्वेगाड्यांत एकीकडे तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्यांना जागा मिळत नाही. दुसरीकडे काही फुकटे प्रवासी बिनधास्त पाहिजे तेथून पाहिजे त्या ठिकाणी प्रवास करतात. 

जनरलचे तिकीट असताना चक्क एसीच्या डब्यात गर्दी करतात. जागा नसल्याने ते थेट बाथरूमच्या दारापाशीही गर्दी करून असतात. परिणामी खूप दिवसांपूर्वी रिझर्वेशन करून कन्फर्म तिकीट मिळवत प्रवासाला सुरुवात करणाऱ्या प्रवाशांना अवैध प्रवास करणाऱ्यांचा नाहक त्रास सहन करावा लागतो. हा प्रकार लक्षात घेत वैध तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्यांना त्रास होऊ नये आणि अवैध प्रवास करणाऱ्यांना धडा मिळावा, या हेतूने मध्य रेल्वेच्यानागपूर विभागाने विशेष कारवाईची मोहीम आखली आहे. 

त्यानुसार, नागपूर - मुंबई मार्गावर वर्धा रेल्वे स्थानकावर २ आरपीएफ कर्मचारी आणि १८ तिकीट निरीक्षकांनी अचानक तिकीट तपासणी सुरू केली. या तपासणीत काही तासांतच २८१ अवैध प्रवासी हाती लागले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रेल्वे प्रशासनाने १ लाख, ७२ हजारांची रक्कम दंडापोटी वसूल केली.
 
प्रवाशांनी सहकार्य करण्याचे आवाहन
रेल्वेचा प्रवास आनंददायक आणि आरामदायक व्हावा यासाठी प्रशासन आवश्यक ते सर्व प्रयत्न करीत आहे. प्रवाशांनी तिकीट घेऊनच प्रवास करावा आणि ज्या श्रेणीचे तिकीट घेतले, त्याच श्रेणीच्या डब्यात बसून प्रवास करून सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Web Title: In one day, 281 ticketless passengers at one railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.