सहा महिन्यात पावणेसात लाख मोबाईलधारकांनी काढले ई-तिकिट
By नरेश डोंगरे | Updated: July 5, 2024 18:50 IST2024-07-05T18:50:17+5:302024-07-05T18:50:41+5:30
Nagpur : रेल्वे तिकिटांचीही मागणी मोबाईलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात

In six months, near about seven lakh mobile phone holders have drawn e-tickets
नरेश डोंगरे - नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मोबाईलचा अधिकाधिक वापर करण्यावर अनेक जण भर देत असतानाच रेल्वेतिकिटांचीही मागणी मोबाईलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गेल्या सहा महिन्यात तब्बल पावणेसात ई-तिकिटांची मागणी प्रवाशांनी केली. यामुळे मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचा तिकिट काढून देण्याचा आणि पैसे देण्या-घेण्याचा ताण चांगलाच हलका झाला आहे.
प्रत्येक क्षेत्रात डिजिटलायझेशनचे प्रमाण चांगले वाढले आहे. कमी वेळेत मोठ्यात मोठा व्यवहार पार पडत असल्यामुळे आणि त्यासाठी कसल्याही क्लिष्ट प्रकाराला सामोरे जावे लागत नाही. विशेष म्हणजे, हा व्यवहार कुठूनही करता येतो आणि त्याचा पक्का पुरावाही जवळ असतो. त्यामुळे खास करून अनेक जण डिजिटल पेमेंटवर भर देतात.
अगदी अलिकडच्या काही महिन्यापूर्वी रेल्वेचे तिकिट काढणे म्हणजे प्रचंड कटकटीचे काम होते. वाहनांच्या गर्दीतून मार्ग काढत लांबलचक अंतरावर असलेल्या रेल्वे स्थानकावर जा. तेथे कोंदट वातावरणात लांबच लांब गर्दीत नंबर येण्याची वाट बघत उभे राहा. काऊंटरच्या खिडकीवर पोहचल्यावर तिकिट देणारा चिल्लर नाही म्हणून सबब सांगून कचकच करेल आणि हे सर्व दिव्य पार पाडल्यानंतर रेल्वेचे तिकिट मिळणार. यामुळे रेल्वे तिकिट काढण्यासाठी एक प्रकारे परिक्षा दिल्याचीच अनुभूती रेल्वे प्रवाशांना मिळत होती. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून रेल्वे प्रशासनाने अनेक सेवांचे डिजिटलायझेशन केल्यामुळे अनेक प्रवाशांची या कटकटीपासून सुटका झाली आहे. अशात आता अनारक्षित तिकिट काढण्यासाठी मध्य रेल्वेने यूटीएस मोबाइल ॲपची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे प्रवासी घरबसल्या मोबाईलच्या माध्यमातून ई-तिकिट मिळवू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर, जानेवारी ते जून या सहा महिन्यात यूटीएस मोबाइल ॲपच्या माध्यमातून ६ लाख, ८४ हजार, ६०८ प्रवासी तिकिटांची विक्री झाली आहे. ज्यामुळे रेल्वेच्या तिजोरीत १ कोटी, ४५ लाख, २६ हजार, ९७५ रुपये जमा झाले आहे.
नागपूरसह २१ स्थानकांवर जन-जागरण
जास्तीत जास्त प्रवाशांनी मोबाईल ॲपचा वापर करावा म्हणून मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील नागपूरसह २१ रेल्वे स्थानकांवरून जनजागृती केली जात आहे. हे ॲप कसे वापरायचे, त्याची माहिती रेल्वे कर्मचारी देत आहेत. प्रवासी त्यांच्या स्मार्ट मोबाईलवरून पेपरलेस प्रवास तिकीट, सीझन तिकीट आणि प्लॅटफॉर्म तिकीट बूक करू शकतो. ॲपच्या माध्यमातून तिकिट काढण्याची पद्धत अतिशय साधी असल्याने प्रवासी त्याला पसंती दर्शवित आहेत. रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकट्या जून महिन्यात १ लाख, १४ हजार, ९४९ प्रवाशांनी ॲपच्या माध्यमातून तिकिटे काढली आहेत.