६०-७० च्या दशकात नागपूरकर तरुणांवर रमेश देवांच्या नाटकांची भुरळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2022 10:59 IST2022-02-03T10:50:52+5:302022-02-03T10:59:49+5:30
१९६०-७० च्या दशकात नागपूरकर तरुणाईवर रमेश देवांच्या नाटकांची भुरळ हाेती. मात्र त्यांच्या देखण्या रूपापेक्षा त्यांच्या साधेपणाविषयी लाेकांना अधिक प्रेम हाेते.

६०-७० च्या दशकात नागपूरकर तरुणांवर रमेश देवांच्या नाटकांची भुरळ
नागपूर : मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत रमेश देव (Ramesh Deo) यांचे त्याकाळी माेठे नाव हाेते; पण त्यांचे नाट्यप्रेम कमी झाले नव्हते. नाटकाच्या निमित्ताने त्यांचे नागपूरला अनेकदा येणे हाेत हाेते. १९६०-७० च्या दशकात तर नागपूरकर तरुणाईवर त्यांच्या नाटकांची भुरळ हाेती. मात्र त्यांच्या देखण्या रूपापेक्षा त्यांच्या साधेपणाविषयी लाेकांना अधिक प्रेम हाेते. त्यांच्या प्रत्येक भेटीच्यावेळी सहृदयी माणसाला भेटल्याचा अनुभव शहरातील रंगकर्मींनी व्यक्त केला.
ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश एदलाबादकर यांनी त्यांची आठवण सांगितली. २००५ मध्ये नृत्य कीर्तन महाेत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते नागपूरला आले हाेते. राजराजेश्वरी रंगमंदिरात हा महाेत्सव हाेणार हाेता; पण पावसामुळे ऐनवेळी तात्या टाेपे हाॅलमध्ये उद्घाटन पार पडले. रमेश देव व पत्नी सीमा हे जाेडीने या कार्यक्रमात सहभागी झाले हाेते. पावसामुळे झालेल्या खाेळंब्याचा त्रास त्यांनी जाणवू दिला नाही. त्यावेळी त्यांची मुलाखत घेतली हाेती. हे दाेघेही चित्रपट सृष्टीतील त्यांच्या वाटचालीबद्दल भरभरून बाेलले हाेते. ज्येष्ठ बाल नाट्यकर्मी संजय पेंडसे यांनी शिक्षक सहकारी बॅंकेत असलेल्या कार्यक्रमातील भेटीची आठवण सांगितली.
शहरातील गणेश साेळंकी, किशाेर प्रधान, माेहन काेठीवान यांच्या समन्वयामुळे मैत्रीपूर्ण संबंध हाेते. राजदत्त यांच्याशी असलेल्या मैत्रीच्या उल्लेख रमेश देव आवर्जून करायचे. रमेश देव यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टी व नाट्यसृष्टी समृद्ध करणारे पर्व संपल्याची भावना नाट्यकर्मींनी व्यक्त केली.
आमच्या पिढीचा मॅटिनी आयडाॅल
या देखण्या नटाने अनेक मराठी, हिंदी चित्रपटांतून अभिनयाचे काैशल्य दाखविले. ते आमच्या पिढीचे मॅटिनी आयडाॅल हाेते. ज्या ताकदीने नायकाची भूमिका केली, त्याच ताकदीने खलनायकही रंगविला. मराठीप्रमाणे हिंदीतही त्यांना मान हाेता. त्यांच्या निधनाने मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील एक युग समाप्त झाले.
- प्रकाश एदलाबादकर, ज्येष्ठ साहित्यिक
राजबिंडा अभिनेता गमावला
त्यांच्या रूपाने सिनेमासृष्टीला दमदार अभिनयाचा लाेभसवाणा अभिनेता मिळाला. ते राजबिंडा नट आणि सहृदयी माणूस हाेते. अभिनयात कुठलाही अभिनिवेश नव्हता आणि व्यक्तिमत्त्वात गर्व नव्हता. विदर्भातील रंगकर्मींचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे ते सांगायचे. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टी व मनाेरंजन विश्वाची माेठी हानी झाली आहे.
- संजय पेंडसे, बाल नाट्यकार
चित्रपटसृष्टी समृद्ध केली
श्वेत शाम काळात त्यांनी मराठी व हिंदी चित्रपटसृष्टी समृद्ध केली. नायकाच्या भूमिकेसह खलनायकही एवढा गाेड असू शकताे, हे रमेश देव यांनी दाखवून दिले. त्यांच्या व सीमा देव यांच्या उपस्थितीने सिनेसृष्टीला रंगतदार केले. मराठी चित्रपट व रंगभूमीवरील राजबिंडा अभिनेता गमावला आहे.
- संजय भाकरे, ज्येष्ठ नाट्यकार