मृृतक प्राचीची झाली प्रांजली अन चटप झाली चटक; पोलिसांची अशीही असंवेदनशीलता, एफआयआरमध्ये चुकविली मृतकांची नावे

By योगेश पांडे | Published: June 14, 2024 10:18 PM2024-06-14T22:18:21+5:302024-06-14T22:18:39+5:30

एफआयआरमध्ये चक्क काही मृतकांची नावेदेखील चुकविली आहे. यामुळे पोलिसांच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

In the case of Chamundi Explosive Company blast in Dhamana, the police spent eleven hours to file a case | मृृतक प्राचीची झाली प्रांजली अन चटप झाली चटक; पोलिसांची अशीही असंवेदनशीलता, एफआयआरमध्ये चुकविली मृतकांची नावे

मृृतक प्राचीची झाली प्रांजली अन चटप झाली चटक; पोलिसांची अशीही असंवेदनशीलता, एफआयआरमध्ये चुकविली मृतकांची नावे

नागपूर : धामणा येथील चामुंडी एक्सप्लोसिव्ह कंपनी स्फोट झाल्यानंतर पोलिसांकडून काय कारवाई होते याकडे मृतक, जखमींच्या नातेवाईकांचे लक्ष लागले होते. स्फोट दुपारी एक वाजता झाल्यावर या प्रकरणात तातडीने कारवाई होणे अपेक्षित होते. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी तब्बल अकरा तास लावले. इतकेच नाही तर एफआयआरमध्ये चक्क काही मृतकांची नावेदेखील चुकविली आहे. यामुळे पोलिसांच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

दुपारी एक वाजताच्या सुमारास स्फोट झाल्यानंतर हिंगणा पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी रवाना झाले. त्याचप्रमाणे तीव्रता लक्षात घेता पोलीस आयुक्त डॉ.रविंद्रकुमार सिंगल यांच्यासह वरिष्ठ अधिकारीदेखील तेथे पोहोचले. नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांनी दिले होते. कंपनीचे पदाधिकारीदेखील माहिती देण्यासाठी उपलब्ध होते. मात्र पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात रात्रीचे जवळपास १२ वाजविले.

ज्यावेळी ‘लोकमत’कडे एका नातेवाईकाने एफआयआरची प्रत पाठविली त्यावेळी त्यातील काही नावे चुकल्याची बाबदेखील समोर आली. मृतक पन्नालाल बंदेवार यांचा मुलगा अनुराग याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. एफआयआरमध्ये मृतक प्राची फलके हिचे नाव प्रांजली फलके असे करण्यात आले आहे. तर प्रांजली मोंदरे हिचे नाव प्रांजली मोदरे असे नमूद आहे. शीतल आशीष चटप या मृतक महिलेचे नाव शीतल आशीष चटक करण्यात आले आहे. या प्रकारामुळे अगोदरच आक्रोश करणाऱ्या नातेवाईकांमध्ये संताप वाढला आहे.

तक्रारीत जी नावे देण्यात आली त्यानुसार एफआयआरची प्रत तयार करण्यात आल्याचा दावा एका अधिकाऱ्याने केला. मात्र प्रकरण इतके मोठे व गंभीर असताना तसेच पोलीस प्रशासनाकडे प्रत्येक गोष्टीची नोंद असताना नावे चुकविण्याचा असंवेदनशीलपणा झालाच कसा असा सवाल उपस्थित होत आहे.

Web Title: In the case of Chamundi Explosive Company blast in Dhamana, the police spent eleven hours to file a case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.