न्यायालयात आरोपींकडून पोलिसांना जिवे मारण्याची धमकी, तर ‘लॉकअप’मधील गुन्हेगाराचा आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2023 08:15 AM2023-02-15T08:15:00+5:302023-02-15T08:15:01+5:30
Nagpur News न्यायालयात सुनावणीसाठी गेलेल्या कैद्यांनी पोलिस पथकातील कर्मचाऱ्यांनाच फिल्मी स्टाईलने जिवे मारण्याची धमकी दिली, तर दुसरीकडे कळमना पोलिस ठाण्यात ‘लॉकअप’मध्ये असलेल्या आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी देत आत्महत्येचा प्रयत्न केला.
योगेश पांडे
नागपूर : शहरातील गुन्हेगारांवर वचक ठेवण्यावर भर देण्यात येत असल्याचा दावा पोलिस अधिकाऱ्यांकडून करण्यात येत असला तरी प्रत्यक्षात ताब्यात असलेल्या आरोपी व कैद्यांनाच पोलिसांचा धाक उरला नसल्याचे चित्र आहे. २४ तासांत घडलेल्या दोन घटनांमुळे शहर पोलिस दलात खळबळ उडाली आहे. न्यायालयात सुनावणीसाठी गेलेल्या कैद्यांनी पोलिस पथकातील कर्मचाऱ्यांनाच फिल्मी स्टाईलने जिवे मारण्याची धमकी दिली, तर दुसरीकडे कळमना पोलिस ठाण्यात ‘लॉकअप’मध्ये असलेल्या आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी देत आत्महत्येचा प्रयत्न केला.
पहिली घटना न्यायमंदिरात घडली. मध्यवर्ती कारागृहात असलेल्या पाच कैद्यांना घेऊन पोलिसांचे पथक न्यायालयात पोहोचले. अमजद खान, शहजाद खान व दत्तू दाभणे या आरोपींनी लिफ्टऐवजी पायऱ्यांनी घेऊन जाण्याची जिद्द धरली. मात्र, पोलिसांनी त्यांचे म्हणणे ऐकले नाही. यावरून आरोपींनी अरेरावीची भाषा वापरली. सुनावणी झाल्यावर न्यायालयाने आरोपींच्या नातेवाइकांना काही वेळ भेटण्याची परवानगी दिली. वेळ संपल्यावर लिफ्टने खाली जात असताना नातेवाइकांना तेथून बाहेर काढण्यात आले. यावरून आरोपी चिडले. अमजदने ‘मी नेहमीसाठी तुरुंगात राहणार नाही, बाहेर आल्यावर तुम्हाला पाहून घेईल’, अशी कर्तव्यावरील पोलिसांना धमकी दिली व शिवीगाळ केली. त्यानंतर तिघेही आरोपी पोलिस पथकाच्या अंगावर धावून आले. पोलिसांनी त्यांना ताळ्यावर आणले. सदर पोलिस ठाण्यात तीनही कैद्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आत्महत्येच्या नावाखाली पोलिसांना अडकविण्याचा प्रयत्न
दुसरीकडे कळमना पोलिस ठाण्यातील एका आरोपीच्या कृत्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना चांगलाच घाम फुटला. घरफोडीच्या एका गुन्ह्यात चौकशीसाठी ठाण्यातील पथकाने सावन जोगणे या आरोपीला मध्यवर्ती कारागृहातून ‘प्रोडक्शन वॉरंट’वर आणले. रविवारी त्याची चौकशी सुरू असताना त्याने नैसर्गिक विधीसाठी जायचे आहे असे कारण सांगितले व पोलिसांनी त्याला स्वच्छतागृहात नेले. दरवाजाच्या बाहेरच एक कर्मचारी उभा होता.
१० मिनिटे झाल्यावरदेखील तो बाहेर न आल्याने त्याला आवाज देण्यात आला. त्याने प्रतिसाद न दिल्याने कर्मचाऱ्यांनी दरवाजा उघडला व समोरील दृश्य पाहून ते हादरले. सावनच्या हातात एक चाकूसदृश वस्तू होती व तो स्वत:चाच गळा कापण्याचा प्रयत्न करत होता. त्याने कपाळावरदेखील घाव मारले होते व त्याचे हात रक्ताने माखले होते. माझी चौकशी करत आहात, पण मला माहिती नाही असे सांगितल्यावरदेखील तुम्ही ऐकत नाही. आता मी स्वत:ला संपवून तुम्हालाच अडकवतो, अशी भाषा वापरत त्याने परत वार करण्याचा प्रयत्न केला. उपस्थित पोलिसांनी कसाबसा त्याच्या हातातून चाकू घेतला व त्याला तातडीने मेयो रुग्णालयात नेले. आरोपीची प्रकृती धोक्याबाहेर असली तरी यामुळे अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.