‘इन्स्टंट लोन’च्या नावाखाली युवतीचे अश्लील फोटो व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2022 09:24 PM2022-07-30T21:24:48+5:302022-07-30T21:25:20+5:30
Nagpur News नागरिकांना ‘इन्स्टंट लोन’चे आमिष दाखवून लुबाडण्याचा गोरखधंदा सायबर गुन्हेगारांनी चालविला असून, यातून मिळालेले रक्कम चीनमध्ये पाठविण्यात येत असल्याची माहिती पुढे आली आहे.
नागपूर : नागरिकांना ‘इन्स्टंट लोन’चे आमिष दाखवून लुबाडण्याचा गोरखधंदा सायबर गुन्हेगारांनी चालविला असून, यातून मिळालेले रक्कम चीनमध्ये पाठविण्यात येत असल्याची माहिती पुढे आली आहे. नागपुरातील २१ वर्षीय युवतीची आरोपींनी ‘इन्स्टंट लोन’च्या माध्यमातून फसवणूक करून तिचे अश्लील फोटो व्हायरल केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे चीनपर्यंत असून, या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त नुरुल हसन यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कैफ इब्राहिम सय्यद (२५, सोमवारपेठ, कऱ्हाड) ईरशाद ईस्माईल शेख (३२, दापोडी, पुणे) अशी आरोपींची नावे आहेत. अजनी पोलीस ठाण्यात २१ वर्षांच्या युवतीने जानेवारी महिन्यात फसवणूक झाल्याची तक्रार दिली होती. यात एका लिंकच्या माध्यमातून तिने लोनसाठी अर्ज केला होता. त्यासाठी तिला पॅनकार्ड क्रमांक, फोटो आयडी मागण्यात आला होता. काही वेळातच तिच्या खात्यात १ हजार २०० रुपये जमा करण्यात आले. परंतु काही दिवसांतच तिला फोनवरून ५ हजार ४०० रुपये जमा करण्याचा तगादा लावण्यात आला. तसे न केल्यास तिचे अश्लील फोटो आणि कॉलगर्ल असल्याची माहिती प्रसारित करण्याची धमकी दिली. त्यामुळे युवतीने मागितलेले पैसे जमा केले.
परंतु पुन्हा ७ हजार ८०० रुपयांची मागणी करण्यात आली. ते पैसेही दिल्यानंतर त्या युवतीचे अश्लील फोटो आणि कॉलगर्ल असल्याचे सांगून तिचा मोबाइल क्रमांक तिच्या नातेवाईक आणि इतरांना पाठविण्यात आला. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी अनेक तांत्रिक बाबी तपासून बँकेची मदत घेतली असता त्यात कऱ्हाड येथील दोन युवकांचा हात असल्याचे स्पष्ट झाले.
त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्या खात्यात प्रत्येकी २७ लाख रुपये आढळले. वसूल केलेल्या रकमेच्या मोबदल्यात ३ टक्के रक्कम कमिशन म्हणून मिळत असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यांच्याजवळ असलेले व्हॉट्सॲप क्रमांक हॉंगकॉंग, चायना, दुबई, फिलिपिन्स येथील असल्याचे तपासात स्पष्ट झाले. या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होणार असल्याचे पोलीस उपायुक्त नुरुल हसन यांनी सांगितले. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारीन दुर्गे, सहायक पोलीस निरीक्षक शेळके उपस्थित होते. ‘इन्स्टंट लोन’च्या नावाखाली नागरिकांच्या तक्रारी असल्यास त्यांनी अजनी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
..............