८ टक्के गर्भवती कोरोनाबाधित, जिल्ह्यात २७० गर्भवतींना संसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2022 11:04 AM2022-01-31T11:04:06+5:302022-01-31T11:15:30+5:30

नागपूर जिल्ह्यात मागील २९ दिवसात ८.६१ टक्के गर्भवती महिला कोरोना पॉझिटिव्ह आल्या. मेयो आणि मेडिकलमध्ये यातील १३२ महिलांची प्रसूती झाली.

In the third wave 8 percent of pregnant women are affected by covid-19 in nagpur district | ८ टक्के गर्भवती कोरोनाबाधित, जिल्ह्यात २७० गर्भवतींना संसर्ग

८ टक्के गर्भवती कोरोनाबाधित, जिल्ह्यात २७० गर्भवतींना संसर्ग

Next

सुमेध वाघमारे

नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसऱ्या लाटेतील संसर्गाचा वेग पाचपट जास्त आहे. परिणामी, गर्भवती महिलांमध्ये संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. नागपूर जिल्ह्यात मागील २९ दिवसात ८.६१ टक्के गर्भवती महिला कोरोना पॉझिटिव्ह आल्या. मेयो आणि मेडिकलमध्ये यातील १३२ महिलांची प्रसूती झाली.

नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा वेग झपाट्याने वाढत आहे. १ ते २९ जानेवारी या कालावधीत तब्बल ६० हजार ५१४ रुग्ण पॉझिटिव्ह आले. तर १०० रुग्णांचा जीव गेला. याच कालावधीत ३ हजार १३३ गर्भवतींची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली. यातील २७० गर्भवतींना संसर्ग झाल्याचे आढळून आले. सध्याच्या स्थितीत इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) या दोनच रुग्णालयात कोरोनाबाधित गर्भवतींच्या प्रसूतीची सोय आहे.

मेयोमध्ये ३९ तर मेडिकलमध्ये ९३ बाधितांची प्रसूती

मेयोमध्ये मागील २९ दिवसात ५३१ गर्भवतींची तपासणी केली असता ६३ महिला पॉझिटिव्ह आल्या. यातील ३९ बाधित महिलांची प्रसूती करण्यात आली. मेयोमध्ये या रुग्णांसाठी सर्जिकल कॉम्प्लेक्समध्ये ३० खाटांचा वॉर्ड व शस्त्रक्रिया गृह उपलब्ध आहे. मेडिकलमध्ये याच कालावधीत ९३ बाधितांची प्रसूती करण्यात आली. येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये ‘एचडीयू’ क्र. ४ व ५ पॉझिटिव्ह गर्भवती महिलांसाठी स्वतंत्र असून दोन शस्त्रक्रिया गृह उपलब्ध आहेत.

नॉर्मल प्रसूतीचे प्रमाण ४० टक्के

मेयो व मेडिकल मिळून झालेल्या प्रसूतींमध्ये नॉर्मल प्रसूतीचे प्रमाण ४० टक्के आहे. मेयोमध्ये २८ बाधित गर्भवतींची सिझेरियन तर ११ नॉर्मल प्रसूती झाल्या. मेडिकलमध्ये ५० सिझेरियन तर ४३ नॉर्मल प्रसूती झाल्या आहेत.

९९ टक्के शिशू कोरोनामुक्त

१ ते २९ जानेवारी रोजी मेयो, मेडिकलमध्ये कोरोनाबाधित १३२ महिलांच्या प्रसूतीत सुदैवाने जवळपास ९९ टक्के शिशू कोरोनामुक्त असल्याचे आढळून आले. केवळ १ टक्का महिलांचे शिशू पॉझिटिव्ह आले.

बाधित गर्भवतींची काळजी घ्या

गर्भवती कोरोना बाधित आल्यास कोणतीही चिंता करण्यासाठी परिस्थिती नसते. परंतु काळजी घेणे गरजेचे असते. या रुग्णांवरही इतर रुग्णांप्रमाणे उपचार घ्यावे लागतात. वेळीच तपासणी व डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा ठरतो. माता व बाळाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आजाराकडे दुर्लक्ष करू नये.

-डॉ. अनिल हुमणे, स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ, मेडिकल

:: मेडिकल (१ ते २९ जानेवारीपर्यंत)

-एकूण ९३ प्रसूती : ४३ नॉर्मल : ५० सिझेरियन

:: मेयो एकूण ३९ प्रसूती : ११ नॉर्मल : २८ सिझेरियन

Web Title: In the third wave 8 percent of pregnant women are affected by covid-19 in nagpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.