ओरिसातील रेल्वेच्या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर एसटीचे नागपूरसह राज्यातील सर्व कार्यक्रम रद्द
By नरेश डोंगरे | Published: June 3, 2023 03:43 PM2023-06-03T15:43:17+5:302023-06-03T15:45:06+5:30
एसटी महामंडळाचे अमृतमहोत्सवी वर्धापनदिनानिमीत्त्य राज्यभरातील विविध बसस्थानकांवर वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते
नागपूर : ओरिसातील रेल्वेच्या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर एसटी तर्फे आयोजित नागपूरसह राज्यातील सर्व कार्यक्रम एसटीने रद्द केले.
राज्य मार्ग परिवहन महामंडळच्या (एसटी) अमृत महोत्सवी वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त शनिवारी, ३ जून २०२३ ला नागपूरसह राज्यभरातील विविध बसस्थानकांवर वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
मुंबईलात कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार होते. तर नागपूरसह राज्यातील प्रत्येक एसटी बस स्थानकावर विविध उपक्रम राबवले जाणार होते. त्यामुळे शनिवारी सर्व आगार व बसस्थानकावर आकर्षक रांगोळी काढून, फुले, आंब्याची पाने यांची तोरण बांधण्यात आली होती.
आगारातील प्रत्येक बस स्वच्छ धुवून सजविने, फलक तयार करुन बसस्थानकाच्या दर्शनी भागात लावणे, सकाळी १० वाजता सर्व प्रवाशी व कर्मचारी बांधवांना पेढे वाटून वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देण्याचे ठरले होते. मात्र रेल्वेच्या भीषण अपघातामुळे एसटी महामंडळाने हे कार्यक्रम रद्द केले आहे. हे कार्यक्रम पुढे घेण्यात येतील, असे एसटी अधिकाऱ्यांनी कळविले आहे.