या ‘हनुमान’ कढईत शिजेल ‘श्रीराम शिरा’; ७००० किलोचा प्रसाद

By निशांत वानखेडे | Published: January 16, 2024 06:59 PM2024-01-16T18:59:57+5:302024-01-16T19:00:38+5:30

शेफ विष्णू मनोहर करणार अयोध्येतील श्रीराममंदिराला कढई अर्पण

In this 'Hanuman' cauldron, 'Shriram Shira' will be cooked; 7000 kg Prasad | या ‘हनुमान’ कढईत शिजेल ‘श्रीराम शिरा’; ७००० किलोचा प्रसाद

या ‘हनुमान’ कढईत शिजेल ‘श्रीराम शिरा’; ७००० किलोचा प्रसाद

नागपूर : अयोध्यात राम मंदिर अभिषेक सोहळ्याच्या निमित्त शेफ विष्णू मनोहर येत्या, २२ तारखेला श्री जगदंबा संस्थान कोराडी येथे ६ हजार किलोचा महाप्रसाद तर अयोध्येत २६ जानेवारीनंतर ७ हजार किलोचा ‘श्रीराम शिरा’ तयार करून दोन नवे जागतिक विक्रम प्रस्थापित करणार आहेत. त्याकरीता जगातील सर्वात मोठी ‘हनुमान’ कढई तयार करण्यात आली आहे. ही कढई विष्णू मनोहर अयोध्येतील श्रीराम मंदिराला अर्पण करणार आहेत.

ही हनुमान कढई १५ हजार लिटर क्षमतेची असून १८०० किलो वजन व १५ फूट व्यासाची आहे. ही कढई तयार करण्यासाठी ६ मीमी जाडीचा स्टीलचा पत्रा वापरला गेला असून हा पत्रा धरणाची दारे किंवा जहाज बांधणीसाठी उपयोगात आणला जातो. कढईचा तळभाग लोखंड व तांबे या धातूंपासून तयार करण्यात आला आहे. तो १० फूट आकाराचा आहे. दोन धातूंचे पत्रे एकावर एक तळाशी लावल्यामुळे ते उष्णता शोषून घेतील आणि शिरा जळणार नाही. या कढईत वापरला जाणारा एक सराटा हा २४ इंच रुंदीचा असून ३२ किलो वजनाचा आहे.
ही कढई नागेंद्र विश्वकर्मा व त्यांचे वडील अनिरूद्ध विश्वकर्मा यांच्या देखरेखीखाली तयार करण्यात आली आहे. ही कढई घडवायला २० कारागीराची मदत घेण्यात आली. हे आव्हानात्मक कार्य करायला जवळपास एक महिन्याचा कालावधी लागला.

२२ जानेवारी अयोध्येत श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होत असताना कोराडी येथील श्रीजगदंबा देवस्थानमध्ये ६ हजार किलोचा ‘श्रीराम शिरा’ तयार केला जाणार आहे. हा एक विश्वविक्रम ठरणार असून तो विष्णू मनोहर श्री जगदंबा संस्थान कोराडीच्या नावे समर्पित करणार आहेत. त्यानंतर ही ‘हनुमान’ कढई क्रेनच्या सहायाने मोठ्या ट्रेलरवर चढवून अयोध्येला रवाना केला जाईल. अयोध्येत पोहोचायला या कढईला दोन दिवस लागतील.

मी प्रभू श्रीरामांचा भक्त असून वयाच्या २२ व्या वर्षी ‘कार सेवा’ केली होती. आता अयोध्येत राममंदिर साकार होत असताना प्रभू श्रीरामाच्या चरणी ‘पाक सेवा’ देण्याच्या उद्देशाने या उपक्रमाला ‘कार सेवा ते पाक सेवा’ असे नाव देण्यात आले आहे. ‘हनुमान’ कढई अयोध्येत पोहोचल्यानंतर येत्या, २६ जानेवारीनंतर तेथे ७ हजार किलो ‘श्रीराम शिरा’ तयार केला जाणार आहे. हा देखील एक विश्वविक्रम ठरणार असून तो श्रीराम मंदिर न्यासच्या नावे नोंदवला जाईल. त्यानंतर ही ‘हनुमान’ कढई श्रीराम चरणी अर्पण केली जाणार आहे, असे ते विष्णू मनोहर म्हणाले.

Web Title: In this 'Hanuman' cauldron, 'Shriram Shira' will be cooked; 7000 kg Prasad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.