विदर्भात पावसानं भिजलं सारं रान, नागपूरकर मात्र उकाड्याने हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2023 11:10 AM2023-07-06T11:10:49+5:302023-07-06T11:11:03+5:30
यवतमाळात १४६ मि.मी., गडचिराेलीतही झमाझम : पारा घसरला पण...
नागपूर : गेल्या अनेक दिवसांपासून विदर्भवासी आकाशाकडे टक लावून पाहत हाेते. अखेर विदर्भावर वरुणराजाची कृपादृष्टी बरसली; पण नागपूरकरांबाबत मात्र अवकृपा दिसून आली. नागपूरकरांच्या पदरात थाेड्या थेंबाशिवाय काहीच पडले नाही. पारा काही अंशी घसरला खरा पण उकाड्याचा त्रास कमी झाला नाही.
बुधवारी दिवसभर अकाेला वगळता पावसाने कुठेही हजेरी लावली नाही; मात्र मंगळवारच्या रात्री धाे-धाे बरसलेल्या पावसाने विदर्भात बहुतेक भागाला चिंब केले. यवतमाळात १२ तासात तब्बल १४६.१ मि.मी. पाऊस झाला. या जिल्ह्यातील आर्णी, दिग्रस, महागाव तालुक्यातही पाऊस जाेरात बरसला. गडचिराेली जिल्ह्यातही वरुणराजाची बरी कृपा झाली. रात्रभरात शहरात ६८ मि.मी. पावसाची नाेंद झाली. याशिवाय वर्धा ३७.२ मि.मी., बुलढाणा ३२, गाेंदिया ३१.५ मि.मी. तसेच चंद्रपूर, अमरावतीत दिलासा देणारी हजेरी लावली. अकाेल्यात बुधवारी ३२ मि.मी. पाऊस बरसला.
नागपुरात रात्री काही ठिकाणी ५-१० मिनिटांसाठी सरी आल्या पण ते अगदीच नगण्य हाेते. जिल्ह्यात कळमेश्वरला मात्र जाेरात पाऊस झाला. येथे ६४ मि.मी. पावसाची नाेंद झाली आहे. बुधवारी दिवसभर मात्र पावसाने हुलकावणी दिली. सकाळपासून ढगाळ वातावरण हाेते खरे; पण दमट उकाड्याने आजही नागरिकांचा घाम काढला. पारा २.८ अंशाने घसरत ३४.२ अंशावर आला पण सरासरीपेक्षा अद्याप ताे अधिक आहे. विदर्भातील इतर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे पारा २४ तासात ३ ते ६ अंशापर्यंत खाली घसरला. रात्रीच्या तापमानातही माेठी घसरण झाल्याचे दिसून आले.
हवामान विभागाने आणखी दाेन दिवस विदर्भात चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे नागपूरकरांना वरुणराजाची कृपा बरसण्याची आस आहे.