विदर्भात सर्वाधिक १७.४९ लाख वीज ग्राहकांच्या मोबाईलची नोंदणी नागपुरात
By आनंद डेकाटे | Published: October 16, 2023 02:38 PM2023-10-16T14:38:57+5:302023-10-16T14:39:18+5:30
विदर्भात एकूण ५७ लाखावर वीजग्राहकांनी केली नोंदणी : अमरावती व अकोला दुसऱ्या क्रमांकावर
नागपूर : ग्राहक सुविधांचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या नागपूर प्रादेशिक कार्यालयांतर्गत असलेल्या विदर्भातील अकराही जिल्ह्यातील तब्बल ५७ लाख ९ हजार ३५७ वीजग्राहकांनी स्वतःच्या मोबाईल क्रमांकाची महावितरणकडे नोंदणी केली असून एकूण वीज ग्राहकांच्या तुलनेत ही टक्केवारी ९१.१३ टक्के आहे. यात नागपूर परिमंडळातील सर्वाधिक १७ लाख ४९ हजार ४१५ ग्राहकांनी आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंद केली आहे.
नागपूर पाठोपाठ अमरावती परिमंडळातील १२ लाख ८४ हजार ८९०, अकोला परिमंडळातील १२ लाख ६५ हजार ६६, चंद्रपूर परिमंडळातील ७ लाख ५२ हजार ४०३ तर गोंदीया परिमंडळातील ६ लाख ५७ हजार ५८३ ग्राहकांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे केली आहे. टक्केवारीनुसार विचार करता गोंदीया परिमंडलातील सर्वाधिक ९३.४२ टक्के ग्राहकांनी त्याखालोखाल अकोला परिमंडळातील ९२.४६ टक्के ग्राहकांनी, नागपूर परिमंडळातील ९१.१३ टक्के ग्राहकांनी, अमरावती परिमंडळातील ९०.४६ तर चंद्रपूर परिमंडळातील ८८.८६ ग्राहकांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकाची नोंद महावितरणकडे केली आहे.
महावितरणकडे मोबाईल क्रमांकाची नोंदणी करणाऱ्या वीज ग्राहकांना मीटर रिडिंग, वीजबिलाचा तपशील, वीज बंद असण्याचा कालावधी यासह विविध माहिती 'एसएमएस'द्वारे पाठवण्यात येते. ग्राहकांना मीटर रीडिंग घेतल्यानंतर काही तासांच्या आत रीडिंग घेतल्याची तारीख, वेळ, सध्याचे एकूण युनिट व वापरलेले विजेचे युनिट याचा तपशील असणारा 'एसएमएस' महावितरणकडून पाठवण्यात येतो. यात विसंगती आढळल्यास तातडीने तक्रार करून बिलासंदर्भात निर्माण होणारे नंतरचे वाद टाळता येतात. तर वीजबिल तयार झाल्यानंतर बिलाची रक्कम व बिल भरण्याची अंतिम मुदत याची माहिती असणारा 'एसएमएस' ग्राहकांना पाठवला जातो.
याशिवाय नियोजित देखभाल व दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात येणारा वीजपुरवठा व पुरवठा खंडित राहण्याचा कालावधी याची पूर्वसूचना 'एसएमएस'मार्फत दिली जाते. तांत्रिक किंवा इतर कारणामुळे वीजपुरवठा बंद झाल्यास त्याची माहिती व वीजपुरवठा पूर्ववत होण्यासाठी लागणारा कालावधीची माहिती या सुविधेत मिळते.