विदर्भात कुठे मुसळधार तर कुठे रिमझिम पाऊस; ब्रम्हपुरीत सर्वाधिक १४४.४ मि.मी. पावसाची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 10:24 AM2023-07-17T10:24:56+5:302023-07-17T10:27:31+5:30
पुढचे तीन दिवस संपूर्ण विदर्भात यलो अलर्ट
नागपूर : हवामान खात्याने संपूर्ण विदर्भात पुढचे तीन दिवस यलो अलर्ट दिला आहे. शनिवारी मध्यरात्रीपासून पूर्व विदर्भातील गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. रविवारी दिवसभरात नागपुरातही भरपूर पाऊस झाल्याची नोंद हवामान खात्याने केली आहे. दुसरीकडे पश्चिम विदर्भात यवतमाळ वगळता अमरावती, वर्धा येथे हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. पण रविवारी सकाळपर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यात १४४.४ मि.मी. करण्यात आली आहे. त्यानंतर गोंदियामध्येही ८७ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.
- गोंदियात २४ तासांत ६३.०३ मि.मी. पावसाची नोंद
जुलै महिना अर्धा संपत असताना आणि केलेल्या पेरण्या करपण्याच्या मार्गावर असल्याने जिल्ह्यातील बळीराजाचे लक्ष वरुणराजाच्या प्रतीक्षेत महिनाभरापासून लागले होते. अखेर महिनाभराच्या कालावधीनंतर पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावल्याने बळीराजासह जिल्हावासीय सुद्धा सुखावले आहेत. शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर रविवार (दि. १६) सकाळपर्यंत कायम राहिल्याने जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ६३.०३ मिमी पाऊस झाला असून आठपैकी पाच तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तर धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने पुजारीटोला धरणाचे चार व कालीसरार धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहे.
पावसामुळे सडक अर्जुनी तालुक्यातील कोसमतोंडी- बोळुंदा नाल्यावर तयार केलेला रपटा वाहून गेल्याने या दोन्ही गावांचा संपर्क तुटला होता. गडचिराेलीमध्ये रविवारी पहाटे व सकाळी बहुतांश भागात दमदार पाऊस झाला. जिल्ह्यातील बहुतांश नद्या ओसंडून वाहत आहेत. वैनगंगा, गाेदावरी, वर्धा या नद्यांमध्येही धरणाचे पाणी साेडल्याने या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. दमदार पावसामुळे धान राेवणीच्या कामांना वेग आला आहे.
- यवतमाळात मुसळधार, अमरावतीत तूट
अमरावती जिल्ह्यात अजूनही सरासरीच्या तुलनेत २८ टक्के पावसाची तूट आहे. २४ तासांत सरासरी ३.३ मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात आतापर्यंत २८८ मिमी पावसाची आवश्यकता असताना प्रत्यक्षात २०७ मिमी पाऊस झालेला आहे. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांत ११ मंडळांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त पाऊस झाला. यामुळे शेतजमीन खरडून गेली. यात शेतातील उभे पीकही वाहून गेले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी पिकांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. अतिवृष्टीने लोही, कलगाव, तुपटाकळी, मालखेड खु., पांढरकवडा, पाटणबोरी, पहापळ आणि घोटी या भागात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. या ठिकाणी एकाच दिवशी ६५ ते ९७ मिमी पावसाची नोंद काही तासांत करण्यात आली. रविवारी सकाळपासूनच पावसाने जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावली. वर्धा जिल्ह्यात २४ तासांत ढगाळ वातावरण होते. पावसाच्या नाममात्र सरी बरसल्या. पण मुसळधार पावसाची शेतकऱ्यांसह नागरिकांना प्रतीक्षा आहे.
नागभीड-नागपूर राष्ट्रीय महामार्ग झाला होता बंद
जिल्ह्यात शनिवारी रात्री तसेच रविवारी सकाळी सर्वदूर पाऊस कोसळला. दरम्यान, नागभीड, सिंदेवाही, चिमूर तालुक्यांतील काही रस्ते बंद झाल्याने अनेक गावांतील संपर्क तुटला. बाह्मणी नाल्यावरील पुरामुळे नागपूर-नागभीड मार्ग रविवारी सकाळी ६ वाजता बंद झाला. यामुळे या मार्गाने प्रवास करणारे शेकडो प्रवासी बाह्मणीत अडकले होते. तळोधी- बाळापूर हा मार्गही बंद झाला. नवेगाव पांडव फाट्यावरून बाळापूरकडे जाणाऱ्या मार्गावरील रेल्वेच्या बोगद्यात पाणी साचून असल्याने बाळापूर मार्ग दिवसभर बंद होता. सिंदेवाही तालुक्यातील नदीला, नाल्यांना आलेल्या पुरामुळे सिंदेवाहीकडून जाणारा रामाळा, गडबोरी, वासेरा मार्ग बंद झाला. तालुक्याचा १५ गावांचा संपर्क तुटला होता.
गोसेखुर्द धरणाचे ३१ दरवाजे उघडले
भंडारा जिल्ह्यात गेल्या ३६ तासांपासून पावसाची संततधार सुरू आहे. २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ४२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. गोसेखुर्द धरणाचे ३१ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.