चार झोनमधील सफाई कर्मचाऱ्यांना अपुऱ्या किट्सचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:07 AM2021-05-27T04:07:52+5:302021-05-27T04:07:52+5:30

नागपूर - कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये शहरात हजारो नागरिकांचे मृत्यू झाले असून, मनपाचे सफाई कर्मचारी अंत्यसंस्काराची जबाबदारी पार पाडत आहेत. ...

Inadequate distribution of kits to cleaners in four zones | चार झोनमधील सफाई कर्मचाऱ्यांना अपुऱ्या किट्सचे वाटप

चार झोनमधील सफाई कर्मचाऱ्यांना अपुऱ्या किट्सचे वाटप

Next

नागपूर - कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये शहरात हजारो नागरिकांचे मृत्यू झाले असून, मनपाचे सफाई कर्मचारी अंत्यसंस्काराची जबाबदारी पार पाडत आहेत. वर्षभरापासून कुणी ना कुणी कर्मचारी अंत्यसंस्कारासाठी कर्तव्यावर होते.

परंतु शहरातील चार झोनमधील सफाई कर्मचाऱ्यांना अपुऱ्या पीपीई किट्सचे वाटप करण्यात आले आहे. दोन लाटांमध्ये जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना १०७ दिवसांच्याच पीपीई किट देण्यात आल्या. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली.

उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत नागपूर महानगरपालिकेकडे विचारणा केली होती. १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत कोरोनामुळे मृत पावलेल्यांच्या अंत्यसंस्कारासाठी मनपाने किती कर्मचारी नेमले होते, त्यांना किती पीपीई किट देण्यात आल्या, पीपीई किटवर किती खर्च झाला, अंत्यसंस्कारासाठी अतिरिक्त किती रक्कम देण्यात आली, इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. मनपाच्या मंगळवारी, लक्ष्मीनगर, आसीनगर व हनुमाननगर या चार झोनकडून याची माहिती देण्यात आली. प्राप्त माहितीनुसार, मनपाने वर्षभरात ७५ लाख २३ हजार रुपये खर्च करून २५ हजार पीपीई किटची खरेदी केली व १० झोनमधील कर्मचाऱ्यांना त्याचे वाटप झाले. चार झोनमधील कर्मचाऱ्यांना ७ हजार ४०१ पीपीई किट्सचे वाटप झाले तर, तेथील ६९ कर्मचारी अंत्यसंस्काराच्या कर्तव्यावर होते. प्रत्येक कर्मचाऱ्याच्या वाटेला सरासरी १०७ किट आल्या. परंतु वर्षभराच्या ३६५ दिवसाच्या तुलनेत हा आकडा फारच कमी आहे. पीपीई किट ही एकदाच वापरावी, असे दिशानिर्देश एफडीएकडून देण्यात आले आहेत. मात्र असे असताना दररोज एका पीपीई किटच्या हिशेबाने वाटप का झाले नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अंत्यसंस्कारासाठी नेमण्यात आलेल्या सफाई कर्मचाऱ्यांना कुठलेही अतिरिक्त मानधन देण्यात येत नसल्याचेदेखील मनपाने स्पष्ट केले आहे.

चार झोनमध्ये दोन हजाराहून अधिक मृत्यू

१ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत या चार झोनमध्ये २ हजार ३९ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सर्वाधिक ५९८ मृत्यू मंगळवारी झोनअंतर्गत नोंदविण्यात आले.

गांधीबाग झोनकडे किट्सची माहितीच नाही

गांधीबाग झोनमधील अधिकाऱ्यांनी माहिती अधिकाराचे प्रश्न नीट वाचण्याचीदेखील तसदी घेतली नाही. किती कर्मचारी अंत्यसंस्कारासाठी नेमले आहेत, याची माहिती देण्याऐवजी किती सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला, याची त्यांनी माहिती दिली. याशिवाय कर्मचाऱ्यांना किती पीपीई किट्सचे वाटप झाले, याची कुठलीही माहिती झोनकडे उपलब्ध नाही. ही मनपा मुख्यालयाशी संबंधित बाब असल्याचे उत्तर देण्यात आले. इतर झोनकडे माहिती असताना गांधीबाग झोनकडून मनपा मुख्यालयाकडे अंगुलीनिर्देश करणे अनेक प्रश्न उपस्थित करणारे आहे.

झोन - कार्यरत सफाई कर्मचारी - अंत्यसंस्कारासाठी नेमलेले कर्मचारी -पीपीई किट वाटप

मंगळवारी - ८४१ - १४ - १६३५

लक्ष्मीनगर - ६६८ - ८ - २१२०

आसीनगर - ८४१ - १४ - २४४०

हनुमाननगर - ६६२- ३३ - १२०६

Web Title: Inadequate distribution of kits to cleaners in four zones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.