अपुऱ्या पोषक घटकांमुळे बालकांमध्ये संसर्गाचा धोका अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 10:04 AM2021-06-28T10:04:13+5:302021-06-28T10:08:54+5:30

Nagpur News बालकांचे आरोग्य आणि पोषण सुधारण्यात भारतात मोठ्या प्रमाणावर काम होत आहे. मात्र, मुलांच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये जीवनसत्वे व खनिजांच्या कमतरतेमुळे संसर्गाचा धोका वाढला आहे.

Inadequate nutrition increases the risk of infection in children | अपुऱ्या पोषक घटकांमुळे बालकांमध्ये संसर्गाचा धोका अधिक

अपुऱ्या पोषक घटकांमुळे बालकांमध्ये संसर्गाचा धोका अधिक

Next
ठळक मुद्दे‘एमओएचएफडब्ल्यू’चा अहवाल १२.७ लाख चिमुकल्यांचा जीवनसत्व व खनिजांच्या अभावी मृत्यू

 लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : बालकांचे आरोग्य आणि पोषण सुधारण्यात भारतात मोठ्या प्रमाणावर काम होत आहे. मात्र, मुलांच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये जीवनसत्वे व खनिजांच्या कमतरतेमुळे संसर्गाचा धोका वाढला आहे. दरवर्षी जन्माला येणाऱ्या जवळपास २६ दशलक्ष बालकांपैकी सुमारे ७ लाखांपेक्षा अधिक मुले नवजात अवस्थेतूनही पुढे जात नाहीत. त्यातील १२.७ लाख चिमुकल्यांचा अपुऱ्या पोषक घटकांमुळे मृत्यू होत असल्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने (एमओएचएफडब्ल्यू) आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे. कोरोनाचा संभावित तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता बालकांच्या पोषणघटकांकडे लक्ष देण्याचा सल्ला बालरोगतज्ज्ञानी दिला आहे.

बालकांच्या आयुष्यातील पहिले १००० दिवस त्यांच्या नंतरच्या आयुष्यासाठीचा पाया रचतात. त्याच्या आरोग्याची रचना करतात, त्याला आकार देतात. या कालावधीत पोषक घटकांनी युक्त आहाराचे सेवन अत्यंत महत्त्वाचे ठरते. कारण यामुळेच शारीरिक वाढ, शिकण्याची क्षमता यांच्याबाबत मुलांची क्षमता वाढते. शिवाय, एक मूल म्हणून आणि प्रौढ म्हणूनही ते आजाराला बळी पडणार नाहीत, याची खातरजमा होते. मात्र, या पोषण घटकांच्या कमतरतेमुळे दरवर्षी हजारो मुले पाचव्या वाढदिवसापूर्वीच जीवनसत्व आणि खनिजांच्या अभावाला बळी पडतात. बालकांमधील मृत्यू आणि अपंगत्व यामागील हे एक मुख्य कारण ठरत आहे. या बालकांमध्ये मृत्यूची प्रमुख कारण कुपोषण हेच असल्याचेही अहवालात म्हटले आहे.

-सहा महिन्यानंतर कुपोषणाचा धोका अधिक

बालरोग तज्ज्ञाच्या मते, बालकाच्या वयाच्या सहा महिन्यांनंतर कुपोषणाचा मोठा धोका असतो. या टप्प्यात स्तनपानासोबत पूरक आहार, उदा. जीवनसत्वे आणि खनिज समृद्ध आहार, संतुलित धान्ये, आहार, लोह, बहुजीवनसत्व, ड्रॉप्स पूरक आहार दिल्यास मुलाच्या वाढीव पोषक मागण्या भागवल्या जातात. सहा महिन्यानंतर बाळाला केवळ स्तनपान न देता बाहेरचे अन्नपदार्थ देण्यास सुरुवात होते. याच टप्प्यात पोषक घटक देण्यातील तफावत सर्वाधिक जाणवते. या टप्प्यावर मुलांच्या गरजा वाढलेल्या असतात आणि स्तनपान कमी होते.

-शारीरिक व मेंदूचा वाढीसाठी आहाराची भूमिका महत्त्वाची

बालकांची योग्य वाढ आणि विकासासाठी आहारात पुरेशा प्रमाणात जीवनसत्वे आणि खनिजांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. बाळाच्या पहिल्या वर्षात शरीराची आणि मेंदूची वाढ होते. यामुळे पहिले सहा महिने आईचे दूध दिल्यानंतर पूरक आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

-डॉ. विजय धोके, अध्यक्ष अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स असोसिएशन

Web Title: Inadequate nutrition increases the risk of infection in children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य