नागपूर शहर पोलिसात ‘किंग’ होते इनामदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 12:26 AM2019-11-09T00:26:15+5:302019-11-09T01:33:30+5:30
राज्याचे माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांनी उपराजधानीत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या होत्या. १९९१ ते ९३ दरम्यान त्यांनी पोलीस आयुक्त म्हणून जबाबदारी पार पाडली. त्यावेळी पोलीस आयुक्तांना सांकेतिक भाषेत ‘किंग’ असे संबोधले जात होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्याचे माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांनी उपराजधानीत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या होत्या. अतिशय न्यायप्रिय व कर्तव्यदक्ष असलेल्या इनामदार यांनी पोलीस उपायुक्त, पोलीस आयुक्त म्हणून नागपूर शहराची कमान सांभाळली होती. इनामदार यांचे मुंबई येथे निधन झाले. ते ७९ वर्षाचे होते. स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी म्हणून महाराष्ट्र पोलिसात त्यांची ख्याती राहिली आहे.
मुंबईकर असलेले इनामदार यांचे नागपूरशी सौख्य राहिले आहे. त्यांचे अनेक मित्र नागपुरात आहे. मित्रांच्या कौटुंबिक कार्यक्रमासाठी नागपुरात त्यांची ये-जा राहत होती. येथे आल्यानंतरही ते आपल्या जुन्या सहकाऱ्यांशी आतिशय आत्मियतेने भेटत होते. इनामदार यांची १९७५ मध्ये उपायुक्त म्हणून नेमणूक झाली. १९९१ ते ९३ दरम्यान त्यांनी पोलीस आयुक्त म्हणून जबाबदारी पार पाडली. त्यावेळी पोलीस आयुक्तांना सांकेतिक भाषेत ‘किंग’ असे संबोधले जात होते. पोलीस आयुक्तांचे पद महानिरीक्षकाच्या समकक्ष असते. त्यांच्या काळात शहरातील कायदा व सुव्यवस्था अवस्था विस्फोटक झाली होती. स्वत: इनामदार यातून वाचले होते. पोलिसांना ही स्थिती निपटण्यासाठी फायरिंग करावे लागले. यात नऊ लोकांचा जीव गेला. त्यामुळे तत्कालीन सरकारसुद्धा दबावात आले होते. इनामदार यावेळी कारवाईची पर्वा न करता आपल्या भूमिकेवर ठाम होते.
इनामदार यांच्या कार्यकाळात मेंटेनन्स ऑफ इंटरनल सेक्युरिटी अॅक्ट (मिसा) दहशत होती. इनामदार यांनी या कायद्याचा भरपूर वापर केला. त्यांच्या काळात ३६ आरोपी व अवैध धंद्यात गुंतलेल्यांविरुद्ध मिसा अन्वये कारवाई करण्यात आली. त्यामुळे शहरातील आरोपींनी पळ काढला होता. इनामदार फाऊंडेशनच्या माध्यमातून पोलीस विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
आयुक्त असतानाही पायी सवारी
इनामदार हे व्यायामाला महत्त्व देत होते. बहुतांश त्यांच्या मुंबई-दिल्ली वाऱ्या असायच्या. बरेचदा ते सोनेगाव विमानतळावर उतरल्यानंतर आपल्या सरकारी निवासस्थानापर्यंत पायीच जायचे. तत्कालीन पोलीस अधिकाºयांनी त्यांना बरेचदा सामान्य व्यक्तीप्रमाणे पायीच घरी जाताना बघितले.
३५ वर्षात २९ ट्रान्सफर
इनामदार आपल्या भूमिकेशी कधीही समझोता करीत नव्हते. याच कारणामुळे त्यांच्या ३५ वर्षातील सेवेत २९ वेळा ट्रान्सफर झाली. जळगाव सेक्स स्कॅण्डलच्या चौकशीत त्यांची महत्त्वाची भूमिका होती. ते जेव्हा पोलीस महासंचालक होते, तेव्हा सत्ता परिवर्तन झाले होते. राजकीय नेत्यांशी मतभेदामुळे त्यांनी स्वेच्छिक सेवानिवृत्ती घेतली होती.