रायसोनी समूहाच्या आठव्या राष्ट्रीय विद्यार्थी संसदेचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:08 AM2021-01-23T04:08:20+5:302021-01-23T04:08:20+5:30
नागपूर : रायसोनी समूहाच्या वतीने आयोजित आठव्या राष्ट्रीय विद्यार्थी संसदेचे ऑनलाइन उद्घाटन सकाळी १०.३० वाजता करण्यात आले. यावेळी प्रमुख ...
नागपूर : रायसोनी समूहाच्या वतीने आयोजित आठव्या राष्ट्रीय विद्यार्थी संसदेचे ऑनलाइन उद्घाटन सकाळी १०.३० वाजता करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेत्री, नृत्यांगना तसेच खासदार हेमा मालिनी उपस्थित होत्या.
समारंभात माजी खासदार अजय संचेती, वृत्तवाहिनीचे मुख्य राजकीय संपादक मनीष अवस्थी आणि रायसोनी समूहाचे अध्यक्ष सुनील रायसोनी प्रामुख्याने उपस्थित होते. प्रमुख पाहुण्या हेमा मालिनी म्हणाल्या, हे जग माहिती आणि तंत्रज्ञानाचे आहे. आधीच्या तुलनेत वर्तमानकाळात अनेक संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेण्याची गरज आहे. सुनील रायसोनी म्हणाले, राष्ट्रीय विद्यार्थी संसदेच्या माध्यमातून देशात युवकांना चांगले नागरिक बनविण्याचे कार्य करण्यात येत आहे. मनीष अवस्थी यांनी राष्ट्रीय विद्यार्थी संसदेच्या मागील सात वर्षांतील कार्यावर प्रकाश टाकला. अजय संचेती म्हणाले, राष्ट्रीय विद्यार्थी संसद विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयता तसेच चांगली मूल्ये रुजविण्याचे काम करीत आहे. त्यानंतर ‘पापा कहते है बडा नाम करेगा’ या विषयावर सत्राचे आयोजन करण्यात आले. या सत्रात बिव्हीजी ग्रुपचे अध्यक्ष हनुमंतराव गायकवाड, उद्योजक राम भोगले आणि मनीष पाटील उपस्थित होते. हनुमंतराव गायकवाड यांनी आपण १८ वर्षांचे असताना कसे काम करण्यास सुरुवात केली हे सांगितले. आज त्यांची कंपनी भारतातील सर्वश्रेष्ठ सेवा देणारी कंपनी असल्याचे मत व्यक्त केले. राम भोगले म्हणाले, त्यांच्या वडिलांनी त्यांना आणि त्यांच्या भावंडांना सहकार्य करून आधार दिला. मनीष पाटील म्हणाले, एकदा दहावीत तसेच पदवीच्या प्रथम वर्षात अनुत्तीर्ण झालो. परंतु अखेरच्या वर्षी सुवर्णपदक मिळविले. दुसरे सत्र ‘महिला सशक्तीकरण’ या विषयावर झाले. यात भाजपच्या सदस्या मेधा कुळकर्णी, आमदार विद्या चौहान, कॉंग्रेस सदस्य ज्योत्स्ना एकबोटे, सामाजिक कार्यकर्ता सचिन सावंत, अनिष चिश्ती उपस्थित होते.
..............