नागपुरात डीएनए प्रयाेगशाळा व महाराष्ट्रातील पहिल्या व देशातील तिसऱ्या वन्यजीव डीएनए विश्लेषण विभागाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2021 09:33 PM2021-10-22T21:33:44+5:302021-10-22T21:34:27+5:30
Nagpur News नागपूरच्या प्रादेशिक न्यायसहायक प्रयाेगशाळेत केंद्र शासनाच्या निर्भया निधीतून डीएनए युनिट तसेच महाराष्ट्रातील पहिल्या व देशातील तिसऱ्या वन्यजीव डीएनए विश्लेषण विभागाचे शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन उद्घाटन केले.
नागपूर : अनेकदा गुन्ह्यांमध्ये सबळ पुरावा सापडत नसल्याने गुन्हेगारांपर्यंत पाेहचणे अवघड हाेते. विशेषत: महिला व बालकांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये असे हाेते. गुन्हेगाराच्या दबावामुळे गुन्ह्याला वाचा फुटत नाही. त्यामुळे सुतावरून स्वर्ग गाठण्याचे आव्हान पाेलिसांसमाेर असते. अशावेळी न्यायसहायक प्रयाेगशाळेतून मिळालेला छाेटासा पुरावा सुतावरून गुन्हेगारासाठी फाशीचा दाेरखंड बनवायला कारणीभूत ठरताे. गुन्ह्याला वाचा फाेडण्यासाठी व गुन्हेगाराला शिक्षा देण्यासाठी डीएनए प्रयाेगशाळा सहायक ठरतील, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
न्यायसहायक वैज्ञानिक प्रयाेगशाळा संचालनालयाअंतर्गत नागपूरच्या प्रादेशिक न्यायसहायक प्रयाेगशाळेत केंद्र शासनाच्या निर्भया निधीतून डीएनए युनिट तसेच महाराष्ट्रातील पहिल्या व देशातील तिसऱ्या वन्यजीव डीएनए विश्लेषण विभागाचे शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन उद्घाटन केले. याप्रसंगी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, ऊर्जामंत्री नितीन राऊत, क्रीडा व दुग्धविकास मंत्री सुनील केदार, न्यायिक व तांत्रिक विभागाचे महासंचालक संदीप बिश्नाेई, न्यायसहायक प्रयाेगशाळा संचालनालयाच्या संचालक डाॅ. संगीता घुमटकर, न्यायसहायक प्रयाेगशाळा नागपूरचे उपसंचालक डाॅ. विजय ठाकरे उपस्थित हाेते.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, महिला व मुलामुलींवरील अत्याचारावर नियंत्रण आणण्यासाठी पुढच्या अधिवेशनात शक्ती कायदा मंजूर हाेईल, अशी अपेक्षा आहे. मात्र गुन्हेगारांचा वचक असल्यास कायद्याला अर्थ राहणार नाही. अशावेळी न्यायसहायक डीएनए प्रयाेगशाळा कायद्याला बळकटी देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पाेलिसांनीही तंत्रज्ञानाचा उपयाेग करून गुन्हेगारांच्या पुढचा विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले. वन्यजीव डीएनए युनिटमुळे वनगुन्ह्यांचा तपास अधिक जलदगतीने हाेईल, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.
गृहमंत्री दिलीप वळसे यांनी, नागपूरच्या अधिवेशनात महिला अत्याचारविराेधातील शक्ती कायदा मंजूर हाेईल, असा विश्वास दिला. कायद्याची अंमलबजावणी व जलदगतीने गुन्ह्याचा तपास हाेण्यासाठी डीएनए युनिट सहायक ठरेल. या सेवा परिणामकारक करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. ऊर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले, विदर्भामध्ये जंगल आणि वन्यप्राण्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय शिकाऱ्यांचेही लक्ष्य आहे. वन्यजीव डीएनए युनिटमुळे अशा वन तस्करांवर नियंत्रण आणता येईल. इतर राज्यांनाही फायदा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्राला बदनाम करण्याचे कारस्थान : उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री ठाकरे यांनी एनसीबीच्या अमली पदार्थविराेधी कारवाईवर टीका केली. सध्या महाराष्ट्रात अमली पदार्थ कारवाईचे पेव फुटले आहे, जणू काही संपूर्ण जगातील अमली पदार्थ केवळ महाराष्ट्रात आहेत, असे वातावरण निर्माण केले जात आहेत आणि केंद्रातील तपास युनिटच ते शोधू शकते, असे दाखविले जात आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी २७ कोटी रुपयांचे हेरॉईन पकडले होते पण त्यात हिरोईनचा संबंध नसल्याने त्यांच्या कारवाईला प्रसिद्धी मिळाली नाही. महाराष्ट्र पोलिसांची देशभर ख्याती आहे. महाराष्ट्र व महाराष्ट्र पोलिसांची ही ख्याती बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली.